मुंबई- शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तर दुसरीकडे अजित पवारांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास यांच्या बातचीत केली आहे. अजित पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीत परतावं, अशी अनेक आमदारांची भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार राष्ट्रवादीबरोबरच असल्याचं म्हटलं आहे. अजितदादांनी चूक मान्य करावी आणि राष्ट्रवादीमध्ये परतावं, हेच त्यांच्यासाठी योग्य आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटीलही अजित पवारांचं मन वळवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे अजित पवारांनी केलेलं हे बंड थंड होणार का हे लवकरच समजणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राजभवनावर दाखल झाले होते. त्यांनी अजित पवारांना विधिमंडळ गटनेतेपदावरून काढून टाकल्याचं राज्यपालांना पत्र दिलं आहे. काँग्रेसच्या दिल्लीहून आलेल्या नेत्यांशीही संवाद साधत पवारांनी महाराष्ट्रातील सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं. आज पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी नेत्यांची ये-जा सुरू आहे. भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पवारांची भेट घेतली असून, वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटल्याचं सांगितलं आहे. तर अशोक चव्हाणही सिल्वर ओक बंगल्यात दाखल झाले आहेत. काल सकाळी शरद पवारांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीची बातमी समजल्यानंतर सर्वात आधी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘काळजी करू नका, मी सोबत आहे’ असा धीर दिला. तसेच सेनेचे आमदार सांभाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी काही ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत केली. पक्षाचा विधिमंडळ सभासद किंवा कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपासोबत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेत सहभागी राहणार नाही, याचा मला विश्वास वाटतो. अजित पवारांना समर्थन दिलेले आमदार काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले होते. त्या सर्वच आमदारांनी शरद पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. परंतु त्यातील पाच आमदार गायब असल्याचं नंतर नवाब मलिक म्हणाले होते. इतर राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.
Maharashtra Government: अजित पवारांनी चूक मान्य करावी, हेच त्यांच्यासाठी योग्य; NCPकडून अजितदादांची मनधरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 12:54 PM