मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यात अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली असून राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती उपस्थित राहणार आहे. मात्र या संपूर्ण नाट्यमय घडामोडीत अजित पवारांनी केलेलं बंड चांगलंच गाजलं. भाजपाशी हातमिळवणी करत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने सगळ्यांनाच धक्का बसला.
मात्र अजित पवारांचं बंड थंड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. त्यानंतर अवघ्या साडेतीन दिवसात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात गेलं. अखेर देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा सूपूर्द केल्याने भाजपा सरकार कोसळलं. मात्र या सर्व घटनांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले अजित पवार रात्री शरद पवारांच्या निवासस्थानी पोहचले. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जवळपास 3 तास अजित पवार आणि शरद पवारांची बैठक संपली.
बुधवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी घेण्यात आला. यावेळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर खासदार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या आमदारांचे स्वागत करत होत्या. त्यावेळी अजित पवार विधानभवनात प्रवेश करताच अजित पवारांनी बहिण सुप्रिया सुळेची गळाभेट घेतली. त्यानंतर अनेक राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीलाही अजित पवारांनी उपस्थित लावली होती. त्यामुळे अजित पवार सक्रीय राजकारणातून सन्यास घेणार या चर्चेला सध्यातरी विराम मिळत आहे.
या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले की, मी नाराज नव्हतो. मी पक्षात आहे यापुढेही राहणार आहे. जो पक्ष निर्णय घेईल ते मला मान्य आहे. आपण एक आहोत, शरद पवारांचं नेतृत्व अंतिम आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महाराष्टभर वाढवायची आहे, सामान्य माणसांची सेवा सरकारच्या माध्यमातून करायची आहे असं दादांनी सांगितले तसेच मंत्रिपदाबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं सांगितले.
तसेच राष्ट्रवादीच्या सर्व बैठकीला अजित पवार उपस्थित होते, 2-3 दिवस बैठकीला उपस्थित नव्हते, आजची बैठक विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी बोलविली होती. अध्यक्ष निवड, मंत्रिमंडळ शपथविधी आणि विश्वासदर्शक ठराव यावर चर्चा झाली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. अजित पवार, जंयत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडली. गेल्या 5 दिवसांपासून अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र दिसून येत होतं. मात्र अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्नात पवार कुटुंबाला यश आलं आहे.