मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या अंतिम नाट्यात उद्धव ठाकरे सरकारने शनिवारी बहुमत चाचणी सिद्ध केली. त्यानंतर आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नाना पटोले यांच्या अभिनंदन प्रस्तावावर गटनेते व इतर नेत्यांनी भाषणं केली.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, विधानसभेत अनेक सदस्य नव्याने निवडून आले आहेत, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य मिळालं पाहिजे, अध्यक्ष म्हणून तुम्ही या पदाला न्याय द्याल ही अपेक्षा आहे. विदर्भाचे सुपुत्र या सभागृहाच्या अध्यक्षपदी बसले आहेत त्याचा आनंद आहे. विदर्भाचे प्रश्न सुटले पाहिजेत तसेच कोकण, मराठवाडा, चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच बाळासाहेब थोरात यांनी भाषणात सांगितलं की मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना या नावाचा सर्वात आधी विचार केला होता. यावर अजितदादांनी भाष्य करत काहीकाही लोकांनी विधिमंडळ नेते म्हणून तोडीचं काम केले आहे. एकप्रकारे त्यांचा अपमान झाला. एखाद्या भगिनीला अध्यक्षपद मिळालं असतं तर आनंद झाला असता. प्रतिभा पाटील यांच्या रुपाने लोकसभेला सभापती मिळाल्या मात्र इतर सदस्यांनी अजितदादांना ही चूक लक्षात आणून देताच त्यांच्याकडून राष्ट्रपती असा उल्लेख करण्यात आला. तसेच सभागृहाची उंची वाढविण्याचं काम नाना पटोले यांच्याकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
शनिवारी विधानसभेत बहुमत चाचणी सिद्ध करताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून आकडे सांगून मतमोजणी करण्यात येत होती. त्यावेळीही राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून १६ ऐवजी २० असा आकडा सांगण्यात आला त्यावेळी अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्याकडून आव्हाडांना चूक लक्षात आणून दिली.