Join us

Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक विक्रम; महाराष्ट्रात होणार ऐतिहासिक नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 5:20 PM

Maharashtra Government News: यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने एकत्र येत राज्यात निवडणूक लढविली

मुंबई - अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात भाजपा सरकार अल्पमतात आलं. बहुमताचा आकडा नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सोपाविला आहे. त्यामुळे अवघ्या साडेतीन दिवसापूर्वी आलेलं भाजपासरकार कोसळलं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांचे सरकार अवघे साडेतीन दिवस चालले. देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम राजकीय इतिहासात नोंदविला जाणार आहे. 

यापूर्वी १९६३ मध्ये काँग्रेसचे पी. के सावंत यांनी ९ दिवसांचे सरकार चालविले होते. २५ नोव्हेंबर १९६३ या दिवशी या सरकारचा शपथविधी पार पडला. त्यानंतर ४ डिसेंबरला हे सरकार कोसळून नवं सरकार आलं. वसंतराव नाईक काँग्रेसचे मुख्यमंत्री बनले. वसंतराव नाईक यांच्या नावावर राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिल्याचा मान आहे. ११ वर्ष ७७ दिवस वसंतराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग ५ वर्ष मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा बहुमान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता. ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. 

यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने एकत्र येत राज्यात निवडणूक लढविली, यात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन या दोन्ही पक्षांमध्ये तिढा निर्माण झाला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक वाढविली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. मात्र बहुमताचा आकडा नसल्याने भाजपाने सत्तास्थापन केली नाही. मात्र अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचे पाठिंबा पत्र भाजपाला दिल्यानंतर रातोरात राज्यावरील राष्ट्रपती राजवट  हटवून भाजपाने २३ नोव्हेंबर २०१९ ला सत्तास्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. मात्र राज्यात बदलणाऱ्या घडामोडीनंतर अजित पवारांनी वैयक्तिक कारण सांगून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपा सरकार अल्पमतात गेलं. अखेर २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने सरकार पडलं.    

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपाकाँग्रेसअजित पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019महाराष्ट्र सरकार