मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या मुंबई सेंट्रल स्थानकाचे आता नामांतर होणार आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाला १९ व्या शतकातील समाजसेवक नाना शंकरशेट यांचे नाव देण्यात येणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार आता मुंबई सेंट्र्ल स्थानकाचे नामांतर नाना शंकरशेट टर्मिनस असे करण्यात येईल.
नाना शंकरशेट यांनी त्या काळी आधुनिक मुंबई वसवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. नाना शंकरशेट यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे असे होते. त्यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला होता. नाना शंकरशेट १९ व्या शतकातील प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक होते. त्यांनी आपल्या कमाईमधील फार मोठा वाटा मुंबई शहराच्या उभारणीसाठी तसेच समाजकार्यासाठी खर्च केला होता.
१९व्या शतकात मुंबई शहर विकसित करताना नाना शंकरशेट यांनी मुंबई शहर विकसित होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्या स्वरूपाचे नियोजन करून विकसित करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले होते.