मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने राज्यात स्थापने केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला बुधवारी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर वेगाने हालचाली सुरु होण्यास सुरु झाली आहे. भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. तसेच आम्ही उद्या बहुमत सिद्ध करु असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे भाजपाने आज रात्री 9 वाजता मुंबईतील गरवारे क्लबमध्ये सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी देखील आम्ही बहुमत चाचणी निश्चित विजय मिळवू असं सांगण्यात येत आहे. तसेच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आजच द्यावा असं सांगितले आहे. त्यामुळे उद्या कोणचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विश्वासदर्शक ठराव जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तसे युक्तिवाददेखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. तर या निकालामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील हॉटेल हयातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शिवसेना-अपक्ष आमदारांच्या महाविकासआघाडीच्या 162 विधिमंडळ सदस्यांनी संविधानाला साक्षी मानून सोमवारी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करणार शपथ घेतली. रात्रीच्या अंधारात, अनैतिक मार्गाने स्थापन झालेल्या सरकारच्या विरोधात मत देण्याबाबत शपथ घेण्यात आली होती.