मुंबईः अजित पवारांनी भाजपाबरोबर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानं राज्यात राजकारणात भलताच पेच निर्माण झाला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे अधिकृत विधिमंडळ गटनेते नसल्याचं सांगत राष्ट्रवादीनं त्यांना हटवून त्याऐवजी जयंत पाटलांची निवड केली आहे. त्यानंतर जयंत पाटलांनीही आमच्याकडे 162 आमदारांच्या समर्थनाचं पत्र असल्याचं म्हटलं आहे. तसेच राज्यपालांनी सांगितल्यास आम्ही त्या आमदारांची परेडही करून दाखवू, असा ते म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाची भाजपानं खिल्ली उडवली आहे.भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राहिलेल्या आशिष शेलारांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या परेडची खिल्ली उडवली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जनतेची आणि लोकशाहीची क्रूर थट्टा चालवली आहे. हॉटेलमध्ये आमदारांची परेड करणं आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करणं याची बरोबरी होऊ शकत नाही. ओळख परेड ही साक्षीदारांची होते, ज्यात आरोपींची ओळख पटवली जाते. आम्ही विधानसभेच्या सभागृहात विजय मिळण्याबाबत आश्वस्त आहोत. हॉटेलमध्ये करवून घेतलेली परेड ही सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी सहाय्यक ठरणार नाही. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवानं आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधीजींच्या नेतृत्वाची शपथ घेणं हेसुद्धा दुर्दैवी आहे. सत्ता येते, सत्ता जाते, शिवसेनेचं हिंदुत्व किती बेगडी आहे हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं, शिवसेनेच्या या कृत्यानं मराठी माणसालाही दु:ख झालं असेल. आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाची शपथ घेणं शिवसेनेसाठी आणि मराठी माणसासाठी सर्वात लज्जास्पद बाब आहे, असा टोला आशिष शेलारांनी शिवसेनेला हाणला होता. या तीन पक्षाचा पोरखेळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला, ओळख परेडमुळे विधानसभेचं संख्याबळ सिद्ध होत नाही, गमावलेला आत्मविश्वास वाढवण्याचा टुकार प्रयत्न केला आहे. त्यामुळे फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा मात्र या शर्यतीची फोटोफिनिश देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार हेच करतील, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
Maharashtra Government: महाविकास आघाडीच्या आमदारांच्या परेडची भाजपानं उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 8:45 AM