मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रतीक्षा असताना अद्याप मंत्र्यांचे खातेवाटपदेखील होऊ शकलेले नाही. मात्र मुख्यमंत्र्यांसह सात मंत्र्यांसाठी मंत्रालयातील दालनांचे वाटप मंगळवारी करण्यात आले.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी २८ नोव्हेंबरला झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे व सुभाष देसाई हे शिवसेनेचे, जयंत पाटील, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे तर बाळासाहेब थोरात व नितीन राऊत या काँग्रेसच्या मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र, त्यांच्या खात्यांचे वाटप अद्याप होऊ शकलेले नाही. या बाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालय सहाव्या मजल्यावर असेल. एकनाथ शिंदे यांना तिसरा मजला (विस्तारित ३०२ ते ३०७), सुभाष देसाई यांना पाचवा मजला (मुख्य इमारत ५०२), जयंत पाटील यांना सहावा मजला (विस्तारित ६०७), छगन भुजबळ यांना दुसरा मजला (मुख्य इमारत २०२), बाळासाहेब थोरात यांना पहिला मजला (विस्तारित १०८) तर डॉ. नितीन राऊत यांना चौथा मजला (मुख्य इमारत ४०२) असे दालनांचे वाटप सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.राज्यावर ६.७१ लाख कोटींचे कर्ज - पाटीलराज्यावर ६ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून त्यावरील व्याज तसेच चालू प्रकल्पांसाठी लागणारा निधी आणि भविष्यातील नियोजन या बाबत आढावा घेण्याचे काम सुरू आहे, असे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, राज्यावर ४ लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून विविध पायाभूत प्रकल्पांसाठी २ लाख कोटी रुपयांची हमी राज्य शासनाने दिली आहे. तेही एक प्रकारचे कर्जच मानले जाते.
Maharashtra Government: मंत्रिमंडळ विस्तारासह खातेवाटपाचीही प्रतीक्षा, मंत्रालयातील दालनांचे झाले वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 4:55 AM