मुंबई: गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराल अखेर मुहूर्त मिळाला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. त्यानुसार आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, हे नवे चेहरे कोण असतील, याबद्दल अद्यापही फडणवीस सरकारने कोणेतही ठोस संकेत दिलेले नाहीत. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील (एसआरए) घोटाळ्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रकाश मेहता यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. त्यामुळे आता त्यांच्याजागी कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय, आणखी तीन नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणारे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी पक्षाच्या 38व्या स्थापनादिनी झालेल्या महामेळाव्याच्या निमित्ताने भाजपाच्या सुकाणू समितीची बैठक झाली होती. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. यावेळी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही एक ते दीड तास चर्चा झाल्याचे समजते. महामेळाव्यात भाजपाच्या नेत्यांनी ज्याप्रकारे शिवसेनेला चुचकारण्याची भूमिका घेतली होती त्यावरून आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेलाही ऑफर दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.