Join us

जेएनयूसारखं विद्यापीठ राज्यात उभारणार का?; शरद पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 7:45 PM

शरद पवारांची इंदू मिलला भेट; स्मारकाच्या कामाची पाहणी

मुंबई: स्मारकाचं काम करणाऱ्या कंपनीनं मनात आणल्यास पुढील २ वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उभारणी होऊ शकते. मात्र त्यासाठी संबंधितांनी स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारायला हवं, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. या कामाची आज पवारांनी पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यावेळी नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या प्रतिष्ठीत विद्यापीठाची उभारणी राज्यात करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी पवारांनी राज्य शासनात जेएनयूसारखं विद्यापीठ सुरू करण्याची क्षमता असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी शेती खात्यावर काढण्यात आलेल्या विद्यापीठांचा संदर्भ दिला. 'शेती खात्यावर आधारित विद्यापीठ काढायचा निर्णय झाला, तेव्हा मी सरकारमध्ये होतो. तशा प्रकारचं एक विद्यापीठ काढायचं ठरलं होतं. पण एकावर काम भागलं नाही. त्यामुळे आपण चार विद्यापीठं काढली. प्रत्येक विभागाला एक अशी चार विद्यापीठं आपण सुरू केली, असं पवार म्हणाले. जेएनयूसारख्या विद्यापीठाची उभारणी करण्याची राज्य शासनाची ताकद आहे, असं पवारांनी म्हटलं.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; 26 जानेवारीपासून शाळांमध्ये लागू होणारयावेळी शरद पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवरही भाष्य केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यापेक्षा तो निधी मुंबईतल्या वाडिया रुग्णालयाला द्या, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वाडियासाठी असलेला निधी रुग्णालय प्रशासनाला मिळेल. पण स्मारकं व्हायला हवीत, असं पवार यांनी म्हटलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी स्मारकाला विरोध दर्शवला आहे. स्मारकाला होणाऱ्या विरोधावर पवारांनी कोणाचंही नाव न घेता भाष्य केलं. आपल्याकडे कोणताही प्रकल्प सुरू करायचं म्हटलं की अनेक तज्ज्ञ त्यावर बोलू लागतात. प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण सगळ्यांचं ऐकायचं. त्यातून योग्य ते घ्यायचं आणि बाकीचं सोडून घ्यायचं, असं शरद पवार म्हणाले. 

बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम शापूरजी पालोनजी करते आहे. या कंपनीनं ठरवल्यास स्मारकाचं काम दोन वर्षांत पूर्ण होऊ शकेल. त्यासाठी कंपनीनं हे काम आव्हान म्हणून स्वीकारायला हवं. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी स्मारकाचं काम मनावर घेतल्यास दोन वर्षांमध्ये स्मारकाचं पूर्ण होईल, असं पवार म्हणाले. भविष्यात बाबासाहेबांचं स्मारक देशातच नव्हे तर परदेशातील नागरिकांसाठीदेखील आकर्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाबासाहेबांच्या स्मारकाप्रमाणेच शिवस्मारकाचीदेखील पाहणी करणार का, यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. 

टॅग्स :शरद पवारप्रकाश आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर