मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्क येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ६ जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली. पण मंत्र्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावं घेतली हे नियमबाह्य असून हा शपथविधी रद्द करा अशी मागणी भाजपा आमदाराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याचिकेद्वारे केली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या नव्या सरकारने नियमबाह्य काम सुरु केले आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली हे बेकायदेशीर आहे. कायद्याप्रमाणे शपथ घेताना असं म्हणता येत नाही. त्यामुळे हा शपथविधी रद्द करा अशी याचिका करण्यात आली आहे. भाजपा आमदाराने ही याचिका केली आहे, जर राज्यपालांनी न्याय दिला नाही तर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाईल असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्याचसोबत जर राज्यपालांनी ही याचिका स्वीकारली तर सरकारने या २ दिवसांत घेतलेले निर्णय रद्द होतील असंही ते म्हणाले.
तसेच बाळासाहेबांना आम्ही हिंदुह्दयसम्राट म्हणतो, तुम्ही म्हणाल का? हंगामी अध्यक्ष नियमबाह्य बदलण्यात आला. कालिदास कोळंबकर यांच्याऐवजी दिलीप वळसे पाटील यांना हंगामी अध्यक्ष बनविण्यात आलं. प्रोटोकॉलनुसार शपथविधी झाला नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांच्या डांबून ठेवून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे. आमदारांना कुटुंबाशी संवाद साधता येत नाही. आमदारांना अद्याप कोंडून का ठेवलं? मारुन मुटकून सरकार चालविता येणार नाही, ते जास्त दिवस टिकणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.
दरम्यान, नव्या सरकारने नियम धाब्यावर बसवले आहेत, नियमबाह्य काम करु देणार नाही, आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून याचा विरोध करु, एवढचं नव्हे तर कायद्यानुसार कोणत्याही सभागृहाचा सभासद नसताना मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान होता येत नाही असं सांगत येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरुनही भाजपा आक्रमक होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविले.