Join us

Maharashtra Government: मुख्यमंत्री अन् विधानसभा अध्यक्ष ठरले; विरोधी पक्षनेत्याची घोषणा आज होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 10:40 AM

दुसरीकडे गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षात नाट्यमयरित्या भाजपा विरोधी बाकांवर बसली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिनाभरानंतर राज्यात सरकार स्थापन झाले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीचे नेते म्हणून मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे यांची निवड झाली. शनिवारी ठाकरे सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध करत सरकारच्या बाजूने १६९ आमदार असल्याचं दाखवून दिलं. 

दुसरीकडे गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षात नाट्यमयरित्या भाजपा विरोधी बाकांवर बसली आहे. भाजपाचे यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागा निवडून आल्या आहेत. शिवसेना-भाजपा यांनी एकत्र येत ही निवडणूक लढविली होती. या दोघांना मिळून १६१ जागा मिळाल्या होत्या. मात्र मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षातील तेढ वाढला. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची घरोबा करत राज्यात सरकार स्थापन केले. 

महाविकास आघाडीत शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आणि उर्वरित मित्र पक्षांच्या पाठिंब्यावरुन १६९ आकडा गाठता आला. शनिवारी बहुमत चाचणीत पास झाल्यानंतर ठाकरे सरकारला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरं जावं लागणार होतं. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपाकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली. 

गेल्या अनेक वर्षापासून विधानसभेचा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची प्रथा राज्यात सुरु आहे. पण भाजपाने उमेदवार दिल्याने ही निवडणूक होण्याची शक्यता होती. यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते. त्याला यश आल्याने भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी अर्ज मागे घेत विधानसभा अध्यक्षपदावर नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

सभागृहात मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष ठरले असताना विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप अधिकृत सांगण्यात आलं नाही, शनिवारी आणि रविवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आलं पण विरोधी पक्षनेतेपदाच्या घोषणेचा कार्यक्रम देण्यात आलेला नाही, त्यामुळे नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ही घोषणा होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात होतं. तूर्तास देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरु आहे. मात्र अधिकृत घोषणा आज होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेनाना पटोलेभाजपा