Join us

Maharashtra Government: 'आरे' आंदोलकांचे गुन्हे मागे घेतल्यानंतर 'या' प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 9:02 AM

तसेच आरेचे आंदोलन करणारे सुटले, आता भीमा कोरेगावमधील आंदोलनावेळी मागील सरकारने जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्यावेत अशी मागणी केली. 

मुंबई - आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडसाठी हजारो वृक्ष एका रात्रीत कापण्यात आले. प्रशासनाच्या या कृत्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले. आरेमध्ये मानवी साखळी बनवून निषेध करण्यात आला. त्यानंतर झाडे कापण्याचा विरोध करणाऱ्या वृक्षप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले. फडणवीस सरकारविरोधात तरुणांनी आंदोलन केले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आरेतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. 

रविवारी विधानसभा सभागृहात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरेमधील आंदोलनादरम्यान अनेक तरुण मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पालकांना याची चिंता आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी आव्हाडांनी केली. या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी संध्याकाळी गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिलेत. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आरेचे आंदोलन करणारे सुटले, आता भीमा कोरेगावमधील आंदोलनावेळी मागील सरकारने जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्यावेत अशी मागणी केली. 

तसेच भाजपा आमदार नितेश राणे यांनीही आरेतील आंदोलनाचे केसेस मागे घेतले, आता नाणार आंदोलनाचे केसेस पण परत घ्यावेत, तेही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी केली आहे. 

दरम्यान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही नवीन सरकारकडे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. २०१४ ते २०१९ या दरम्यान नोंदविलेले सर्वच राजकीय, सामाजिक गुन्हे मागे घ्यावेत. यामध्ये मराठा, धनगर आरक्षण आंदोलनातील गुन्हे, शिक्षणसेवक व शिक्षक आंदोलनातील गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. 

शनिवार आणि रविवार झालेल्या विधिमंडळ विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे सरकारने बहुमत चाचणीत यश मिळविले तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध झाली आहे. त्याचसोबत विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभेत येणाऱ्या काळात ठाकरे विरुद्ध फडणवीस असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर रोजी सुरु होणार आहे. त्यापूर्वी दोन दिवसात मंत्रिमंडळ खातेवाटप होईल अशी माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पकोरेगाव-भीमा हिंसाचारनीतेश राणे