नवी दिल्ली - राज्यातील राजकीय घडामोडीचे पडसाद राजधानी दिल्लीतही उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील भाजपा सरकार कोसळणं हे देवेंद्र फडणवीस यांचे अपयश नव्हे तर दिल्लीतील भाजपाच्या चाणक्यांच्या तोंडावर मारलेली चपराक आहे अशा भाषेत काँग्रेसचे नेते के. सी वेणुगोपाळ यांनी भाजपावर टीका केली आहे.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात गेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे अवघ्या साडेतीन दिवसांमध्ये भाजपा सरकार कोसळलं आहे. त्यामुळे भाजपाची नाचक्की राज्यभरात झाली आहे. अजित पवारांसोबत घेऊन सरकार स्थापन करणंही भाजपासाठी नुकसानदायक झाल्याचं बोललं जातंय. सरकारस्थापनेच्या या संघर्षात भाजपाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या संपूर्ण घडामोडीत शरद पवारांची खेळी यशस्वी झाली असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना विचारलं की, भाजपाला शह देण्यासाठी शरद पवारांनी ही खेळी केली का? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याबाबत अजित पवारांनाच विचारु शकता. देवेंद्र फडणवीस यांच्या या उत्तरामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. ज्या अजित पवारांच्या मदतीने भाजपाने सरकार स्थापन केलं. ज्यांच्यावर सिंचनाचे अनेक आरोप लावले गेले होते. यामुळे भाजपाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
तसेच सकाळी अजित पवारांनी माझी भेट घेतली. त्यात त्यांनी आमच्यासोबत येण्यास अडचण आहे असं सांगत राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलं नाही. आम्ही आमदार फोडणार नाही, घोडेबाजार करणार नाही असं आम्ही सांगितले होतं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जे लोक मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते ते अनेकांच्या पायऱ्या झिजवत होते. जनतेच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नव्हता. शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. त्यानंतर राज्यपालांकडे जाऊन आपलं हसं करून घेतलं, सत्तेसाठी सोनिया गांधी यांची लाचारी केली असा टोला शिवसेनेला लगावला. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची बैठक संध्याकाळी होणार आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडीचे नेते म्हणून घोषित करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असं सांगण्यात येत आहे.