मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी त्यांना लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आढळून आल्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, काल त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर आणले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
आज संजय राऊत यांना लीलावती रुग्णलयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपावर निशाणा साधला. यावेळी राज्यपालांनी सर्वांवर अन्याय केला असा आरोप संजय राऊत यांनी केला. राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणाऱ्या राज्यपालांनी सर्वच पक्षांवर अन्याय केला आहे, मुख्यमंत्री आमचाच होईल असे म्हणणाऱ्या आणि १५ दिवसांनी असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपाचे कान राज्यपालांनी धरायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, भाजपाने शब्द देऊनही पाळला नाही. याशिवाय, मध्यावधी निवडणुकीचा दावा नाकारत भाजपा इतरांना सत्ता स्थापन करु देत नसल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.
केंद्रात भाजपाची सत्ता आहे. तिथून सूत्र हलवली जातात. अनेक राज्यांना कळसुत्री बाहुली बनविण्यात आली आहे. भाजपाने एक तर सरकार स्थापन केले नाही. तसेच, इतरांना करता येऊ नये म्हणून यंत्रणा वापरली जाते, याला संसदीय लोकशाही म्हणत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.
याचबरोबर, मध्यवधी निवडणुकांची चर्चा केवळ अफवा असून त्या पसरवण्याचे बंद करा असा सल्लाही संजय राऊत यांनी भाजपाला दिला. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत जी युती होती. त्यात आता फाटाफूट झालेली आहे. आम्ही महाशिवआघाडी केली म्हणजे धर्मांतर केलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली आहे. गेल्या 20 दिवसांपासून ते सत्ता स्थापनेच्या हालचालीमध्ये आघाडीतील नेत्यांसोबत संपर्क साधत आहेत.