मुंबईः राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याचं निश्चित मानलं जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मॅरेथॉन बैठका सुरू असून, ते लवकरच शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करतील, अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक बोलावली होती. शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवरील बैठक संपली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. सत्तास्थापनेच्या संघर्षात फडणवीस वगळता मोदी किंवा शहांनी शिवसेनेशी संवादच साधला नाही, उद्धव ठाकरेंनी बैठकीत आमदारांना माहिती दिली आहे. त्यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं आमदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासंदर्भात विचारले असता उद्धव ठाकरे जो निर्णय घेतली तो मान्य असल्याचं ते म्हणाले आहेत. तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तयारी केली आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पत्रकारांसमोर हात जोडले आणि त्या प्रश्नाचं उत्तर न देता ड्रायव्हरला गाडी नेण्यास सांगितले. तर दुसरीकडे सुनील प्रभू, प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंनी मुंबईत राहण्याचेच आदेश दिल्याचं सांगितले आहे. जयपूरला वगैरे कुठेही जाणार नसून शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतच राहणार असल्याचं सुनील प्रभूंनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसैनिकांची इच्छा आहे. तसेच महाआघाडीच्या सरकारचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंनीच करावं, असं तिन्ही पक्षांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाला तिन्ही पक्षांनी सहमती दिलेली आहे, असा खुलासाही राऊतांनी केला आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जो फॉर्म्युला तयार झाला आहे, त्यात दोन प्रस्ताव असून, ते शिवसेनेसमोर ठेवण्यात येणार आहेत. एका फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे मिळतील आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या वाट्याला प्रत्येकी उपमुख्यमंत्रिपदासह अनुक्रमे 15 व 13 मंत्रिपदे येतील. दुसऱ्या प्रस्तावात शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 14 मंत्री असा उल्लेख आहे.तिन्ही पक्षांना समान मंत्रिपदाची मागणी शिवसेनेने मान्य न केल्यास महत्त्वाची खाती मिळावीत, असा या पक्षांचा आग्रह असेल. राष्ट्रवादीला गृह, अर्थ ही खाती हवी असून, महसूल व ग्रामीण विकास ही खाती आपल्याला मिळावीत, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नगरविकास खाते शिवसेनेला देण्यास दोन्ही पक्षांची तयारी आहे. त्यामुळे समान मंत्रिपदे घ्यायची की काँग्रेस-राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती द्यायची, हा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.
Maharashtra Government: मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी हात जोडले; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 1:27 PM