Maharashtra Government: मुख्यमंत्री अन् विरोधी पक्षनेत्यासाठी फडणवीसच योग्य : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 05:25 AM2019-12-02T05:25:45+5:302019-12-02T05:25:53+5:30
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांचा चांगले मित्र आणि अभ्यासू नेते असा उल्लेख केला.
मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी आणि आता विरोधी पक्षनेतेपदासाठीही भाजपकडे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकी योग्य व्यक्ती नव्हती. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम केले आणि आता ते विरोधी पक्षनेतेपदालाही न्याय देतील, असे कौतुक राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी रविवारी विधानसभेत केले.
फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना विरोधी पक्षनेत्याच्या आसनापर्यंत सन्मानाने नेले. त्यानंतर फडणवीस यांचे सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केले. त्यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, धनंजय मुंडे, भाजपचे चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, बविआचे हितेंद्र ठाकूर, शिवसेनेचे रवींद्र वायकर, अपक्ष बच्चू कडू यांचा समावेश होता.
जयंत पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदी एका अभ्यासू व योग्य व्यक्तीची आज निवड झाली आहे. स्वयंसेवक म्हणून रा.स्व.संघातील चांगल्या बाबींचा फडणवीस यांच्यावर पगडा आहे. मुख्यमंत्री म्हणून राज्य पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. विरोधकांशी वैयक्तिक पातळीवर ते अत्यंत जिव्हाळ्याने वागले.
भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले की, काही काळ फडणवीस विरोधी पक्षनेते राहतील. नंतर त्यांना विरोधी पक्षात बसावे लागणार नाही. विधानसभेचे कामकाज नियमाप्रमाणे झाले असते तर आज चित्र वेगळे राहिले असते. सध्याचे चित्र बदलण्यासाठी मी कोल्हापूरच्या अंबाबाईस प्रार्थना करतो.
आशिष शेलार म्हणाले की, विरोधी पक्षनेतेदी एक जागता मावळा आला आहे. जनतेच्या भल्यासाठी सरकारवर पहारा ठेवण्याचे काम ते समर्थपणे करतील.
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांचा चांगले मित्र आणि अभ्यासू नेते असा उल्लेख केला. पटोले यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
ते कौतुक ‘शोले’सारखं!
- फडणवीस यांचे कौतुक करताना त्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वाक्यावर काढलेले चिमटे, मुख्यमंत्री ठाकरे यांनी मारलेली कोपरखळी, ‘तुम्ही रात्रीतून आणखी काही कराल याची भीती वाटते हे छगन भुजबळ यांचे आदींच्या अनुषंगाने फडणवीस म्हणाले की, शोले सिनेमाची मला आठवण होतेय. त्यात धर्मेंद्रचं कौतुक अमिताभ बच्चन ज्या पद्धतीनं करतो, तसं माझ्याबाबतीत चाललंय अशी मला शंका येते. यावर सभागृहात हशा पिकला.