Maharashtra Government: राज्य सचिवांच्या शासकीय बैठकीला युवासेना सचिवांची हजेरी वादाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 09:26 AM2019-12-04T09:26:28+5:302019-12-04T12:43:44+5:30
सचिवस्तरावरील बैठकीला कोणत्याही शासकीय पदावर नसताना वरुण सरदेसाई यांनी उपस्थिती लावणं हा वादाचा मुद्दा आहे
मुंबई - सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीची सत्ता आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमंत्रालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. या बैठकीला आमदार आदित्य ठाकरे, त्यांचे मावस भाऊ युवासेनेचे वरुण सरदेसाईही उपस्थित होते. त्यामुळे सध्या त्यांचे फोटो व्हायरल होत असून वरुण सरदेसाई यांची उपस्थिती शासकीय बैठकीला कशी होते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीला वरुण सरदेसाई यांची उपस्थिती असल्याचं फोटोत दिसून येतं. मनसेचे संदीप देशपांडे यांनी हा फोटो ट्विट केला आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 4, 2019
सचिवस्तरावरील बैठकीला कोणत्याही शासकीय पदावर नसताना वरुण सरदेसाई यांनी उपस्थिती लावणं हा वादाचा मुद्दा आहे. वरुण सरदेसाई हे युवासेनेचे सरचिटणीस आणि आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र ही चर्चा फोल ठरवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कल्याण पश्चिमेची उमेदवारी शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना दिली होती.