Join us

ठाकरेंचा आदेश फिरवला! मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार; फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:35 PM

आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, असे निर्देश देण्यात आले आहे.

मुंबई: एकामागून एक घडलेल्या अभूतपूर्व घडामोडींनंतर अखेर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता लगेचच देवेंद्र फडणवीस कामाला लागल्याचे सांगितले जात आहे. मुंबई मेट्रोसह जलयुक्त शिवार योजनेच्या कामासंबंधीचे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यावेळी अधिकारी, सचिव यांच्याशी संवाद साधण्यात आला. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो आपल्याला सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गतीमान शासन प्रशासन आहे. असा संदेश आपण कामांच्या माध्यमातून देऊया. मेट्रोचे प्रकल्प, हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले. यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना काही योजनासंदर्भात निर्देश दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

मेट्रोचे कारशेड आरे येथेच होणार

मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडवरून भाजप आणि शिवसेनेत कायम संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरे येथे मेट्रोचे कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता. तेथे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, शिवसेनेचा विरोध असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड होईल, असे निर्देश दिले. मात्र, या जमिनीवर केंद्र सरकारने दावा केला. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. भाजपने याला कडाडून विरोध केला होता. यानंतर आता, आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, असे सूत्रांनी सांगितले. तसेच जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव आणा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, मेट्रोच्या कारशेडचे काम रखडल्यामुळे मुंबई मेट्रोच्या काही टप्प्यांचे परिचालन सुरू होऊ शकलेले नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळाचा भाग असणार नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांना लागेल ती सर्व मदत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अवघ्या काही तासात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जेपी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या मंत्रिमंडळात राहावे आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असे निर्देश दिले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी तयार नव्हते. मात्र, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक नाही, तर दोनवेळा फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला. अखेर पक्षादेश मान्य करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळमेट्रोदेवेंद्र फडणवीसआरे