मुंबई: राज्यात सत्तास्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेने आज सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडीतील मित्रपक्षांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या नंतर शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास मित्रपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकाअर्जून खर्गे या प्रमुख नेत्यांसह तिन्ही पक्षाचे दिग्गज नेते वरळीतील एनएससीआयमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा आज सुटणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याचं निश्चित मानलं जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मॅरेथॉन बैठका सुरू असून, ते लवकरच शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करतील, अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक बोलावली होती. शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवरील बैठक संपली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक वरळीतील एनएससीआयमध्ये सुरु झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, मल्लिकाअर्जून खर्गे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आज महाविकासआघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र आज आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीतील घटक पक्षांसोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यास घटक पक्षांनी समर्थता दर्शविली आहे. ही बैठक राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले की, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांना विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी आम्ही आज बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यास असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.