Join us

Maharashtra Government: ज्यांच्या नावे शपथ घेतली, त्यांच्या तत्त्वानेच राज्य करू; उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 5:50 AM

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर ठाकरे यांनी विधानसभेत पहिले भाषण दिले.

मुंबई : राष्ट्रपुरुषांची नावे घेऊन आम्ही केवळ शपथच घेतली नसून, त्यांच्या तत्वांनुसार राज्य चालविण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. छत्रपती शिवरायांच्या नावे आम्ही एकदा नव्हे, तर प्रत्येक जन्मात शपथ घेऊ, असा प्रतिहल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधानसभेत चढविला.विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर ठाकरे यांनी विधानसभेत पहिले भाषण दिले. आपल्या सरकारवर विश्वास व्यक्त केल्याबद्दल त्यांनी सदस्यांचे आभार मानले. यावेळी विरोधकांनी सभात्याग केलेला होता. मुख्यमंत्री म्हणाले की, रिकाम्या मैदानात तलवार फिरविणे मला आवडत नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आईवडिलांची एकदा वा दहादा नव्हे, तर प्रत्येक जन्मात शपथ घेईन. जो मुलगा आई-वडिलांना मानत नाही तो जगायच्याच लायकीचा नाही.मुख्यमंत्री म्हणाले की मी आयुष्यात पहिल्यांदाच या सभागृहात आलो आहे. इथे येताना निश्चितच दडपण होते. माझ्या मंत्रिमंडळावर सभागृहाने जो विश्वास दाखविला, त्याबद्दल सर्व सदस्यांचे व जनतेचेही आभार मानतो. मी मैदानात लढणारा माणूस आहे. वैधानिक अनुभव मला नाही. सभागृहात कसे होईल, याची मला चिंता होती. पण इथे आल्यानंतर मैदानातच असणे चांगले असे मला वाटले.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर राष्ट्रपुरुषांच्या तसबिरींचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, यांची नावे भाषणातच घ्यायची? शपथविधीच्या वेळी आम्ही त्यांची नावे घेतली तर त्यांना इतक्या इंगळ्या डसाव्यात? दैवते, आई-वडिलांच्या नावाने शपथ घेणे गुन्हा असेल, तर असा गुन्हा प्रत्येक जन्मात मी करेन, असा टोला भाजपला लगावताना ज्यांची शपथ घेतली त्यांना अभिमान वाटेल, असा महाराष्ट्र मला घडवायचा असल्याचा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला.भगवे फेटे उठून दिसले आदित्य ठाकरे सभागृहाला खाली वाकून नमस्कार करून शिरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सभागृहाला वंदन करून प्रवेश केला. ठाकरे पिता-पुत्रासह शिवसेनेचे सर्व आमदार फेटे घालून आले होते.

टॅग्स :उद्धव ठाकरे