Maharashtra Government: महाविकासआघाडीचे सरकार 5 वर्षे चालेल; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:19 PM2019-11-29T12:19:01+5:302019-11-29T12:20:48+5:30
पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकिटं कापल्यानं त्यांना विश्वासात न घेतल्यानंच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचं खडसे अप्रत्यक्षपणे म्हणाले होते.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपावर मात करत शिवसेनेने सरकार बनविले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली आहे. आज सकाळी भाजपाचे माजी आमदार सरदार तारासिंग हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी मातोश्री येथे पोहचले होते.
विशेष म्हणजे सरदार तारासिंग यांचा मुलगा पीएनबी बँके घोटाळ्यात आरोपी आहे. मात्र शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत महाविकासआघाडीचे सरकार 5 वर्षे चालेल असा विश्वास तारासिंग यांनी टीव्ही ९ शी बोलताना व्यक्त केला.
यंदाच्या निवडणुकीत भाजपाने तारासिंग यांना तिकीट नाकारलं होतं. मुलुंड विधानसभेतून तारासिंग निवडून येत होते. सत्ता गेल्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचीही माहिती आहे. आमदारांच्या शपथविधीवेळी भाजपाचे एकनाथ खडसे यांनी ही थेट फडणवीसांविरोधात वक्तव्य करुन खंत व्यक्त केली होती.
देवेंद्र सरकार-2 कोसळताच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकिटं कापल्यानं त्यांना विश्वासात न घेतल्यानंच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचं खडसे अप्रत्यक्षपणे म्हणाले होते. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर 25 जागा वाढल्या असत्या, असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली.
पत्रकारांनी अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या बैलगाडीभर पुराव्यासंबंधी खडसेंना विचारले असता ते म्हणाले, बैलगाडीभर आम्ही जे काही पुरावे गोळा केले होते, ते आम्ही केव्हाच रद्दीमध्ये विकले आहेत. त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता. खडसेंच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खडसे पुढे म्हणाले, 2014ला भारतीय जनता पार्टीकडून दिल्ली आणि महाराष्ट्रमध्ये सामूहिक निर्णय झाला. भारतीय जनता पक्षानं एकट्याच्या बळावर निवडणुका लढवल्या पाहिजेत. जो निर्णय झाला, तो विरोधी पक्षनेता असल्यानं मी तेव्हा घोषित केला. हा निर्णय माझा स्वतःचा नव्हता, तर तो पक्षाचा निर्णय होता. त्या निर्णयाच्या अनुषंगानं जे काही चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं ते सर्वांनीच पाहिलं. त्यानंतर ही चूक दुरुस्त करण्याचाही प्रयत्न झाला.