Join us

Maharashtra Government: पवारांचं राजकारण बहुमत चाचणीवेळीच कळेल; 'त्या' अपक्ष आमदाराला वेगळीच शंका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 7:54 PM

भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदाराला शंका

मुंबई: पवारांच्या कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न राज्याला पडला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेस यांना एकत्र आणत महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली असताना अजित पवारांनी थेट भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवारांची ही कृती बंडखोरी आहे की थोरल्या पवारांची खेळी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार विनय कोरेंनी याबद्दलची शंका बोलून दाखवली आहे.राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचं आपल्याला दिसत आहे. मात्र यातला कोणता गट मोठा आहे ते बहुमत चाचणीवेळीच कळेल, असं विनय कोरे म्हणाले. अजितदादांच्या मागे जास्त आमदार आहेत, पवार साहेबांच्या पाठिशी जास्त आमदार आहेत की हे दोघे एकत्रितपणे या सगळ्या गोष्टी घडवत आहेत, ते विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आल्यावरच समजेल, असं म्हणत कोरेंनी वेगळीच शंका उपस्थित केली. अपक्ष आमदार असलेल्या कोरेंनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.काल सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार माध्यमांपासून लांब राहिले. मात्र राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी अभिनंदन केलं. अजित पवारांनी आज या सगळ्यांचे आभार मानले. मात्र त्याचवेळी मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असंदेखील त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शरद पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा