Join us

Maharashtra Government : 'महाविकासआघाडी'च्या सरकारमध्ये मनसेला स्थान मिळणार?; राजू पाटील म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 9:36 AM

शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे म्हणजेच 'महाविकासआघाडी'चे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडमोडींना वेग आला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेलं सरकार साडेतीन दिवसांत कोसळले. यानंतर शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे म्हणजेच 'महाविकासआघाडी'चे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या महाविकासआघाडीबाबत मनसेने सध्यातरी कोणतीच भूमिका घेतलेली नाही. मात्र मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी नेहमी शेतकऱ्यांचा प्रश्न, बुलेट ट्रेन, नाणार यांसारख्या प्रकल्पांना विरोध दर्शवला होता, तो विरोध विधानसभेत देखील करणार असल्याचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे.

ठाकरेंचे 'भाऊबंध' जुळणार; 'उद्धवदादू'च्या शपथविधीला 'राजा' जाणार?

राजू पाटील यांना सरकार स्थापन होणार आहे यामध्ये मनसेला स्थान मिळणार का असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यासंबंधित निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेची युती झाली नव्हती. मात्र काही जागांवर एकमेकांना सहकार्य केलं असल्याचे देखील राजू पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक झालेली मनसे आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 'मविआ' सरकारमध्ये मनसेचंही 'कल्याण'; उद्धव ठाकरेंच्या टीममध्ये राज ठाकरेंचाही शिलेदार?

महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. त्याच पार्श्वभूमीवर 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी भाजपावर निशाणा साधला. 30 वर्ष ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांच्याविरोधात 30 वर्ष लढतो ते मात्र माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तसेच, तीन टोकाचे तीन लोक एकत्र येत आहोत, पण एक वेगळी दिशा देशाला देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हे जे सरकार आपण बनवणार आहोत, किंबहुना बनलेले आहे, मला नाही वाटत एवढे ज्येष्ठ नेते या आधीच्या सरकारमध्ये राहिलेले असतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :राज ठाकरेराजू पाटीलमनसेराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाशरद पवार