मुंबई - उद्धव ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची परीक्षा विधानसभेत होणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत चाललेला विवाद संपला आहे. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसला मिळणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
आज विधिमंडळ सचिवांकडे नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीने एकमताने नाना पटोले यांची निवड केली आहे. तर नाना पटोले यांच्याविरोधात भाजपाकडून किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तत्पूर्वी भाजपाने हंगामी विधानसभा अध्यक्ष बदलण्यावरुन महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. प्रथा परंपरेनुसार हंगामी अध्यक्षपद कालिदास कोळंबकर यांना देण्यात आलं असताना त्यांच्याजागी दिलीप वळसे पाटील यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. हे सरकार नियमबाह्य पद्धतीने सुरु आहे. मात्र हंगामी अध्यक्ष बदलण्याचा अधिकार सरकारला असतो असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
नाना पटोले यांच्यानिमित्ताने विधानसभेला अनुभवी अध्यक्ष मिळाले आहेत. चारवेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून त्यांना अनुभव आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर झाली आहे. पटोलेंच्या नेतृत्वाखाली सभागृहाचं कामकाज चांगले चालेल - एकनाथ शिंदे, मंत्री
भंडाऱ्याचे सुपुत्र नाना पटोले यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी दिलं आहे त्याचा विशेष आनंद आहे. वैयक्तिकरित्या ते माझ्या जिल्ह्यातून येतात. माझे छोटे बंधू आहेत. गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी नेहमी त्यांनी काम केले आहे. विधानसभेचे कामकाज चांगल्यारितीने ते हाताळतील असा विश्वास आहे - प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी नेते
महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित केले आहे. देशातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होणार आहे. नाना पटोले या पदावर उत्तम काम करतील असा विश्वास आहे - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
मी सर्वांचे आभार मानतो, विधानसभेची जी परंपरा देशात आहेत ती कायम ठेवण्याचं काम मी करेन, जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेईन - नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष उमेदवार