मुंबईः महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध, आपले काका शरद पवार यांच्याविरुद्ध केलेलं बंड आज फसलं आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार साडेतीन दिवसांत कोसळलं. त्यानंतर आता महाविकासआघाडीच्या नेत्यांनी भाजपाची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोला लगावला आहे.
'क्रिकेट आणि राजकरणात काहीही घडू शकतं. ज्यावेळी आपण सामना हरतोय असं आपल्याला वाटतं, तेव्हा नेमकं त्याच्या उलट होतं', असं विधान नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील सत्तापेचासंदर्भात केलं होतं. भाजपा आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून खटका उडाला होता. त्यामुळे जनतेनं स्पष्ट बहुमत देऊनही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं. त्यावेळी, गडकरींनी क्रिकेट आणि राजकारणातील साम्य सांगत, युतीचंच सरकार येईल, अशी आशा व्यक्त केली होती. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्या वाक्याची चर्चा झाली होती. आता आज या दोघांच्या राजीनाम्यानंतर, त्याच वाक्यावरून नवाब मलिक यांनी त्यांची विकेट काढायचा प्रयत्न केलाय.
क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असं नितीन गडकरी म्हणाले होते. परंतु, शरद पवार हे आयसीसीचे अध्यक्ष होते, हे बहुधा नितीन गडकरी विसरले असावेत. आता केलं ना क्लीन बोल्ड?, असा यॉर्कर त्यांनी टाकला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय असल्याची टिप्पणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच आज राज्यात नवं राजकीय नाट्य घडताना पाहायला मिळालं. उद्या बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर, सगळ्यांनीच आकडेमोड सुरू केली होती. 'आम्ही १६२' या आकड्यावर महाविकासआघाडीचे नेते ठाम होते, तर इकडे भाजपाची मंडळी १७० ची हमी देत होती. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राजकारणाने वेगळं वळण घेतलं. अजितदादांच्या माघारीनंतर, देवेंद्र फडणवीस यांनीही बहुमत नसल्याचं सांगत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
महत्त्वाच्या राजकीय बातम्याः
भाजपाला शह देण्याची 'ही' तर शरद पवारांची खेळी?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा उद्या शपथविधी, तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे...
देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक विक्रम; महाराष्ट्रात होणार ऐतिहासिक नोंद
'जनतेनं भगवा फडकवला, पण शिवसेनेनं तो सोनिया गांधी, शरद पवारांच्या चरणी ठेवला'
'सरकार कोसळणं फक्त फडणवीसांचं अपयश नव्हे तर दिल्लीतील चाणक्यांना चपराक'