मुंबई : सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र मध्यावधी निवडणुका लागणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत. त्यामुळे भीती बाळगू नका, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सर्व आमदारांना सांगितले. तसेच, आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांना भेटा, त्यांचे आभार माना, असे शरद पवार यांनी आमदारांना सांगितले आहे.
याचबरोबर, या बैठकीत समान कार्यक्रम ठरविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावे आहेत. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, "काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक होऊन चर्चा होणार आहे. आमच्या दोन पक्षात एकवाक्यता झाल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार आहे. महत्वाच्या पदासंदर्भात चर्चा होईल आणि मार्ग काढला जाईल. तसेच या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत चर्चा करण्यासाठी ही समिती ठरविली गेली. महाराष्ट्रातील चर्चा लवकरात लवकर संपविण्याचा निर्णय घेणार आहे."
दुसरीकडे, भाजपाने मुंबईत आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक उद्या बोलाविली आहे. या बैठकीत संघटनात्मक कार्यप्रणालीवर चर्चा करण्यात येणार आहे. गरज पडली तर मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे समजते.