Join us

शेतकरी आंदोलनाबाबत सचिन, लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्विटची महाराष्ट्र सरकार करणार चौकशी

By बाळकृष्ण परब | Updated: February 8, 2021 15:30 IST

Farmers Protest : सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार आदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरून ट्विट करणाऱ्या मंडळींना प्रत्युत्तर दिले होते. त्यावरून सचिनसह इतरांवर जोरदार टीका होत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे संकेत दिले आहेत. मात्र त्यांनी याबाबतचे कुठल्याही तपासाचे आदेश अद्याप दिलेले नाहीतसर्व सेलिब्रिटीचे ट्वीट एकसारखे कसे काय असू शकतात. त्यांच्यावर कुठला दबाव होता का. याचा तपास झाला पाहिजेकाँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अनिल देशमुख यांच्याकडे केली होती

मुंबई/नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनावरून सध्या देशातील वैचारिक विश्वास दोन गट पडले आहेत. त्यातच परदेशातील काही सेलिब्रिटींनी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार आदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरून ट्विट करणाऱ्या मंडळींना प्रत्युत्तर दिले होते. त्यावरून सचिनसह इतरांवर जोरदार टीका होत आहे. मात्र आता महाराष्ट्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता आहे.महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत. मात्र त्यांनी याबाबतचे कुठल्याही तपासाचे आदेश अद्याप दिलेले नाहीत. मात्र केवळ आश्वासन दिले आहे. शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, लता मंगेशकर, कंगना राणौत यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.  याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, ही बाब गंभीर आहे. त्याचा तपास झाला पाहिजे. याबाबतची जबाबदारी गुप्तचर खात्याला दिली आहे. सर्व सेलिब्रिटीचे ट्वीट एकसारखे कसे काय असू शकतात. त्यांच्यावर कुठला दबाव होता का. याचा तपास झाला पाहिजे, असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला.काँग्रेसने या प्रकरणी पोलीस तपासाची मागणी केली होती. या सेलिब्रिटींवर ट्विट करून सोशल मीडियावर केंद्र सरकारची बाजू मांडण्यासाठी दबाव होता का, अशी शंका उपस्थित करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अनिल देशमुख यांच्याकडे केली होती.सचिन सावंत म्हणाले होते की, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि सायना नेहवालसारख्यांनी केलेल्या ट्विटचा पॅटर्न एकसारखा आहे. सुनील शेट्टीने तर आपले ट्विट भाजपा नेत्याला टॅग केले आहे. याचा अर्थ हे सेलिब्रिटी आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये संपर्क होता. आता देशाच्या या हीरोंवर भाजपाकडून काही दबाव टाकण्यात आला होता का? याचा तपास व्हायला हवा. तसेच जर असे असेल तर या सेलिब्रिटींना अधिक सुरक्षा दिली गेली पाहिजे.

टॅग्स :महाराष्ट्र सरकारसचिन तेंडुलकरलता मंगेशकरअक्षय कुमार