Join us

Maharashtra Government: नियमानुसार बाळासाहेब थोरात विधानसभेत सगळ्यात ज्येष्ठ सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 1:26 PM

विधानसभेत उद्या होत असलेल्या विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कोण होणार यावरून प्रचंड राजकीय चर्चा सुरू झालेली आहे.

- अतुल कुलकर्णी

मुंबई: विधानसभेत उद्या होत असलेल्या विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष कोण होणार यावरून प्रचंड राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना हंगामी अध्यक्ष केले पाहिजे असा प्रघात असताना राज्यपाल कोणाला हंगामी अध्यक्ष करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.2009 साली हंगामी अध्यक्ष म्हणून गणपतराव देशमुख यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी विधानसभेत ते सगळ्यात जेष्ठ सदस्य होते. २०१४ साली देखील गणपत्राव देशमुख सर्वात जास्त वेळा निवडून आलेले जेष्ठ सदस्य होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी हंगामी अध्यक्ष होण्यास नकार दिला होता. त्यांच्या नंतरचे सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांना विचारण्यात आले होते. त्यांनी देखील प्रकृतीचे कारण पुढे करत हंगामी अध्यक्ष पद नाकारले होते. त्यामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांच्यानंतर चे ज्येष्ठ सदस्य जीवा पांडू गावित यांना हंगामी अध्यक्ष करण्यात आले. त्यांनी २०१४ सली निवडून आलेल्या सर्व सदस्यांना आमदारकीची शपथ दिली होती.2019 ला झालेल्या निवडणूक निकालानंतर बाळासाहेब थोरात हे आठ वेळा निवडून आलेले एकमेव सदस्य ठरले आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेमध्ये ते नंबर एक आहेत. त्यानंतर सात वेळा निवडून आलेले सहा सदस्य आहेत. ज्या मध्ये दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, बबनराव पाचपुते, जयंत पाटील, कालिदास कोळंबकर आणि के. सी. पाडवी यांचा समावेश आहे. याच क्रमाने त्यांची नावे विधानभवनाच्या रेकॉर्डवर आहेत. तर सहा वेळा निवडून आलेले ११ सदस्य या यादीत आहेत. विधिमंडळ सचिवालयाने राज्यपालांकडे एकूण १८ नावे पाठवली आहेत त्यात या सगळ्या नावांचा समावेश आहे.विधिमंडळ सचिवालय याने सर्वात जेष्ठ सदस्यांची नावे पाठवणे अपेक्षित आहे. मात्र अत्यंत नाजूक अशी राजकीय परिस्थिती असताना विधिमंडळाने अठरा नावे कळवून स्वतःला या वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपालांनी सगळ्यात जेष्ठ सदस्य म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड करणे संकेतांना धरून आहे. पण ते कदाचित राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये गेलेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले बबनराव पाचपुते किंवा कालिदास कोळंबकर या दोघांपैकी एकाची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करतील अशी शक्यता आहे.

टॅग्स :बाळासाहेब थोरातकाँग्रेसभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस