मुंबईः देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपद आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांनी अजितदादांकडून पक्षनेतेपद हिसकावून घेतलं असून, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आठ ते दहा आमदारांना सोबत घेऊन राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. मात्र त्यांच्यासोबत गेलेले काही आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत.काँग्रेसच्या दिल्लीहून आलेल्या नेत्यांशीही संवाद साधत पवारांनी महाराष्ट्रातील सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं. आज पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी नेत्यांची ये-जा सुरू आहे. भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पवारांची भेट घेतली असून, वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटल्याचं सांगितलं आहे. तर अशोक चव्हाणही सिल्वर ओक बंगल्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी नेते आणि सध्याचे भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची गाडी सिल्व्हर ओक मार्गावरून गेल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. शिवेंद्रराजे भोसले पवारांची भेट घेण्यासाठीच तर सिल्व्हर ओकच्या दिशेनं आलेले नाहीत ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काल सकाळी शरद पवारांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीची बातमी समजल्यानंतर सर्वात आधी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘काळजी करू नका, मी सोबत आहे’ असा धीर दिला. तसेच सेनेचे आमदार सांभाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी काही ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत केली. पक्षाचा विधिमंडळ सभासद किंवा कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपासोबत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेत सहभागी राहणार नाही, याचा मला विश्वास वाटतो. अजित पवारांना समर्थन दिलेले आमदार काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले होते. त्या सर्वच आमदारांनी शरद पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. परंतु त्यातील पाच आमदार गायब असल्याचं नंतर नवाब मलिक म्हणाले होते. इतर राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.