मुंबई - शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी लिलावती रुग्णालयातून बहुमताच्या आकड्याबाबत स्पष्टीकरण दिलंय. बहुमताचा आकडा गाठण्यात शिवसेनेला यश येईल, असे राऊत यांनी सांगितले. सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली आहे. गेल्या 20 दिवसांपासून ते सत्ता स्थापनेच्या हालचालीमध्ये आघाडीतील नेत्यांसोबत संपर्क साधत आहेत. त्यातूनच, शिवसेनेकडे 170 आमदारांचा आकडा असल्याचं विधानही राऊत यांनी केलं होतं.
लिलावती रुग्णालयातून संजय राऊतांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तत्पूर्वी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विश्वजित कदम यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर, राऊतांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे पुन्हा एकदा ठणकाऊन सांगितलं. तसेच, बहुमताचा आकडा आमच्याकडे आहे, ते लवकरच दिसून येईल. पवारसाहेब स्वत: म्हणाले की 170 चा आकडा कुठून आला. संजय राऊतांकडे 170 चा आकडा कुठून येणार हे मला माहित नाही. पण, 170 चा आकडा कुठून येणार हे पवारांनाच माहित आहे, असे म्हणत राऊत यांनी या राजकीय खेळीमागील सुत्रधाराचे नाव अधोरेखित केले आहे. दरम्यान, लवकरच महाशिवआघाडी सरकार बनवेल, असा दावा करण्यात येत आहे. तर, नवीन वर्षापूर्वीच राज्यात सरकार स्थापन झालेलं असेल, असे अजित पवार यांनी म्हटलंय.