मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेलं सरकार साडेतीन दिवसांत कोसळले. यानंतर शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे म्हणजेच 'महाविकासआघाडी'चे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र याआधी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाची विचारधार भिन्न असल्याने महाविकासआघाडीच्या सरकारवर विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु महाविकासआघाडीचे सरकार पुढील 30 वर्षं टिकेल असा विश्वास काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा नेतृत्वामध्ये राज्यात एक सक्षम सरकार तयार होणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या भावना सगळ्यांना एकत्र घेऊन सरकार चालवण्याची आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम हे सरकार करणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. त्याच पार्श्वभूमीवर 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर निवड झाल्यानंतर त्यांनी भाजपावर निशाणा साधला. 30 वर्ष ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांच्याविरोधात 30 वर्ष लढतो ते मात्र माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तसेच, तीन टोकाचे तीन लोक एकत्र येत आहोत, पण एक वेगळी दिशा देशाला देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हे जे सरकार आपण बनवणार आहोत, किंबहुना बनलेले आहे, मला नाही वाटत एवढे ज्येष्ठ नेते या आधीच्या सरकारमध्ये राहिलेले असतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.