Maharashtra Government:...तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल; नवाब मलिकांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 11:21 AM2019-11-30T11:21:49+5:302019-11-30T11:22:33+5:30
Maharashtra Government: फोडाफोडीचे राजकारण भाजपाने करु नये, आम्ही जर आमदार फोडले तर भाजपा रिकामा होईल.
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर कुरघोडी करताना पाहायला मिळत आहे. शपथ घेताना नेत्यांनी नावे घेतल्यामुळे प्रोटोकॉलनुसार शपथ झाली नाही. त्यामुळे ही शपथ बेकायदेशीर असून ती रद्द करावी अशी मागणी भाजपाने केली. यावर राष्ट्रवादी आमदार नवाब मलिकांनीही भाजपाला इशारा दिला आहे.
नवाब मलिक यावेळी म्हणाले की, शपथविधीपूर्वी नेत्यांची नावे घेण्याची प्रथा भाजपाची आहे. लोकसभा सदस्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावे घेतली होती. असं असेल तर भाजपाच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल. भाजपाने दुसऱ्याकडे बोट दाखवू नये असा इशारा त्यांनी भाजपाला दिला.
तसेच फोडाफोडीचे राजकारण भाजपाने करु नये, आम्ही जर आमदार फोडले तर भाजपा रिकामा होईल. हिंमत असेल तर भाजपाने मतदान घेऊन बघावं ११९ आमदारही भाजपाकडे नाही. सत्तेची लालसा दाखवून भाजपाने नेत्यांना प्रवेश दिला. आज सत्ता बनत नसल्याने ते आमदारही आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहे. आमच्याकडे १७० चा आकडा आहे असंही नवाब मलिकांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव विधानसभेत येणार आहे. त्यामुळे बहुमत चाचणीसाठी महाविकास आघाडीला अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. सध्या सत्ताधारी तिन्ही पक्षाकडे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याचं बोललं जात आहे. मात्र प्रत्यक्ष मतदानावेळी सरकारकडे किती आमदारांचे पाठबळ हे त्याची आकडेवारी स्पष्ट होईल.
तत्पूर्वी सरकारने कोणत्याही प्रकारे दगाफटका बसू नये यासाठी हंगामी अध्यक्ष बदलण्याची भूमिका घेतली. कालिदास कोळंबकर यांच्याऐवजी दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली. मात्र विधिमंडळाच्या कायद्यानुसार प्रथा परंपरेनुसार हे नियमबाह्य आहे. विधानसभा अध्यक्ष निवड आणि त्यानंतर बहुमत चाचणी अशी परंपरा आहे मात्र यावेळी बहुमत चाचणी विधानसभा अध्यक्षनिवडीपूर्वी घेण्यात येणार आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष हे गुप्त मतदानाने ठरविण्यात येतो, मात्र तिथेही खुलं मतदान घेऊन परंपरा मोडणार आहे असा आरोप भाजपाकडून केला जात आहे.