Join us

Maharashtra Government: ...अशी तर आम्ही 200 सह्यांची यादी देतो; 'आम्ही 162'वरून नारायण राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 1:37 PM

राज्यातील देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला.

मुंबई- राज्यातील देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असं न्यायालयानं स्पष्ट केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत असून, भाजपा नेते नारायण राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील सत्ता संघर्षात न्यायालयानं दिलेला निर्णय हा भाजपाविरोधात नाही. शिवसेनेला सुप्रीम कोर्ट म्हणजे संजय राऊत वाटतात काय?, तोंडाला येईल ते काहीही बोलतात. कायमचं विरोधी पक्षात राहून आनंद घ्या. शिवसेनेला संविधानाशी काही लेणं-देणं नाही. त्यांचा नियम, संसदीय परंपरा, घटना याच्याशी काही संबंध नसतो. त्यांच्या म्हणण्याची दखल घेऊ नये, असंही नारायण राणे म्हणाले आहेत. महाविकास आघाडीकडे 162 आमदारांच्या असलेल्या यादीवर राणेंनी टीका केली आहे. आम्ही 200 आमदारांची यादी करून देऊ, 162 आमदार होते, मग राज्यपालांनी जेव्हा सत्ता स्थापनेसाठी बोलावलं होतं, तेव्हा का घेऊन गेले नाहीत. 145 तरी घेऊन जायचे ना, 145 नव्हते मग 162 कुठून आणले, असा प्रश्नही राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच हा सगळा प्रकार बोगस आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेसबरोबर कधीही गेले नसते, सोनिया गांधीसुद्धा शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जातील, असं मला वाटत नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या संबंधी न्यायालयानं मार्गदर्शन केलं आहे किंवा तसे आदेश दिले आहेत. विश्वासदर्शक ठराव कसा व्हावा तो हात वर करून व्हावा की गुप्त मतदानानं व्हावा, याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. गुप्त मतदान घेऊ नये, असं न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. उद्या विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यावा, असं न्यायालयानं सांगितलं आहे. आमचा कुठलाही पराभव झालेला नाही, त्यामुळे राजीनामा कसला द्यायचा?, असंही ते म्हणाले आहेत. 

उद्या संध्याकाळी 5 नंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल, त्यात भाजपा सरकार विजयी होईल, असा मला विश्वास आहे. अजित पवारांनी भाजपासोबत राहायचं की पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राहायचं याचा निर्णय घ्यायचा आहे, याचं उत्तर तेच देऊ शकतील. अजित पवार घेतलेल्या निर्णयावर ठाम आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे की उद्या जिंकणारच, असंही राणे म्हणाले आहेत. 

टॅग्स :नारायण राणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेससंजय राऊत