30 वर्षे ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनी विश्वास ठेवला नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 08:38 PM2019-11-26T20:38:50+5:302019-11-26T20:57:43+5:30
'खोटेपणा हा माझ्या हिंदुत्वामध्ये नाही.'
मुंबई : अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' आज कोसळल्यानंतर आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्र विकास आघाडी'चे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह घटक पक्षांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
'महाराष्ट्र विकास आघाडी'चा गटनेता म्हणून निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. 30 वर्ष ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांच्याविरोधात 30 वर्ष लढतो ते मात्र माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तसेच, तीन टोकाचे तीन लोक एकत्र येत आहोत, पण एक वेगळी दिशा देशाला देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. हे जे सरकार आपण बनवणार आहोत, किंबहुना बनलेले आहे, मला नाही वाटत एवढे ज्येष्ठ नेते या आधीच्या सरकारमध्ये राहिलेले असतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Shiv Sena chief and CM candidate of 'Maha Vikas Aghadi', Uddhav Thackeray: I accept the responsibility given by all of you. I'm not alone but you all are CM with me. What has happened today is the actual democracy. Together we will wipe off the tears of farmers in the state. pic.twitter.com/dUtxW3a4nS
— ANI (@ANI) November 26, 2019
मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून माझ्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरी तुम्ही सर्वच माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री आहात. हे केवळ माझे सरकार नसेल तर आपले सरकार असेल. हे आपले सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे सांगतानाच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला अनेक काटे असतात. अनेक खिळेही असतात. जाणारा मुख्यमंत्री दोनचार खिळे लावून जात असतो. कितीही खिळे लावले तरी हातोडा मात्र माझ्या हातात आहे, असा टोलाही यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला.
याचबरोबर, खोटेपणा हा माझ्या हिंदुत्वामध्ये नाही. बाळासाहेब म्हणायचे विचार करून शब्द दे आणि एकदा शब्द दिला की प्राण गेला तरी बेहत्तर, दिलेला शब्द पाडायचा नाही. ज्या वेळेला मी संघर्षात असतो तेव्हा मला नेहमी विचारले जाते की संघर्षात तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का? मला संघर्षात नाही पण संघर्षात विजय मिळविल्यानंतर मला बाळासाहेबांची आठवण येते, असेही सांगत उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, यावेळी उद्धव ठाकरेंनी शरद पवार, सोनिया गांधी यांचे आभार मानले.
दरम्यान, या बैठकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला नाव देण्यात आले. यावेळी 'महाराष्ट्र विकास आघाडी' म्हणून आघाडी स्थापन करण्याचा ठराव शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मांडला. या ठरावाला आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता या आघाडीचे नाव 'महाराष्ट्र विकास आघाडी' असे ठेवण्यात आले आहे.