मुख्यमंत्रिपदाचा आग्रह उद्धव ठाकरेंनी स्वीकारला, संजय राऊतांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 09:43 PM2019-11-22T21:43:50+5:302019-11-22T21:44:15+5:30
'उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारला'
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात खलबतं असून यासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली.
या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर तिन्ही पक्षांनी सहमती दर्शविली आहे. मात्र, या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारला असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. त्यामुळे निश्चितच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव स्वीकारणार असल्याचे दिसून येते.
मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार चालले पाहिजे, यावर आम्ही सर्व सहमत आहोत. सरकार कोणत्या कार्यक्रमाच्या आधारे चालेल. याबाबत चर्चा झालेली नाही, ती उद्या होईल, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर बैठकीत योग्य दिशेने चर्चा चालू आहे. अर्धवट माहिती देण्यापेक्षा लवकरच चर्चा संपवून माध्यमांसमोर येऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आमदारांनी आज दुपारी झालेल्या बैठकीत, उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. परंतु, स्वतः उद्धव मुख्यमंत्री होण्याबाबत फारसे सकारात्मक नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक बसावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी त्यांना दिले होते. त्यामुळे आपण स्वतः मुख्यमंत्री होणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मांडली. मुख्यमंत्री निश्चितीसाठी थोडे थांबा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहण्यापेक्षा उद्धव ठाकरेंची पसंती पक्षप्रमुखपदालाच आहे. ते मुख्यमंत्री झाल्यास शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी कुणाकडे सोपवायची, हा प्रश्न आहे. राज्यभरात पक्ष वाढवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी सक्षमपणे केले आहे. शिवसैनिकांचे त्यांच्याशी असलेले नाते पाहता, हे काम तेच अधिक प्रभावीपणे करू शकतात.