Join us

Maharashtra Government : कौन बनेगा सीएम?... उद्धव ठाकरेंनी सुचवलेली दोनही नावं शरद पवारांना अमान्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 9:13 PM

Maharashtra News : मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वसंमती झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीनंतर सांगितले होते.

मुंबई: मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वसंमती झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीनंतर सांगितले होते. मात्र पहिल्यांदाच आमच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एकत्र चर्चा झाली. बऱ्याच गोष्टीवर आम्ही मार्ग काढला असल्याचे सांगत शरद पवारांच्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलण्यास टाळले. योग्य दिशेने चर्चा चालू आहे. अर्धवट माहिती देण्यापेक्षा लवकरच चर्चा संपवून माध्यमांसमोर येऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापनेसाठी उद्या राज्यपालांकडे जाऊ शकता का? असा सवाल विचारल्यानंतर अद्याप तो निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. 

मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांची उद्धव ठाकरे यांना पसंती होती. मात्र उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री होण्याबाबत फारसे सकारात्मक नसल्याने त्यांनी या बैठकीत एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांची नावं सुचविली. परंतु शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी सुचवलेली दोन्ही नावं अमान्य आहे असे सांगितल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शरद पवारांनी संजय राऊत यांचे नाव पुढे केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीच संजय राऊत यांच्या नावाला विरोध केला असल्याचे माहिती समोर येत आहे.

ना मोदींनी फोन केला, ना अमित शाहांनी; भाजपामुळेच आली ही वेळः उद्धव ठाकरेंचा 'बाण'

राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात खलबतं अद्याप सुरूच आहे. यासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असून मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सहमती झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद स्वीकारणार का? की आपल्या अन्य कोणत्या शिलेदाराकडे या पदाची जबाबदारी सोपवणार? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019