मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात खलबतं अद्याप सुरूच आहे. यासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असून मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सहमती झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद स्वीकारणार का? की आपल्या अन्य कोणत्या शिलेदाराकडे या पदाची जबाबदारी सोपवणार? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार चालले पाहिजे, यावर आम्ही सर्व सहमत आहोत. सरकार कोणत्या कार्यक्रमाच्या आधारे चालेल, याबाबत चर्चा झालेली नाही, ती उद्या होईल, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर बैठकीत योग्य दिशेने चर्चा चालू आहे. अर्धवट माहिती देण्यापेक्षा लवकरच चर्चा संपवून माध्यमांसमोर येऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापनेसाठी उद्या राज्यपालांकडे जाऊ शकता का? असा सवाल विचारल्यानंतर अद्याप तो निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.
आजच्या बैठकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित होते. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आमदारांनी आज दुपारी झालेल्या बैठकीत, उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. परंतु, स्वतः उद्धव मुख्यमंत्री होण्याबाबत फारसे सकारात्मक नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक बसावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी त्यांना दिले होते. त्यामुळे आपण स्वतः मुख्यमंत्री होणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मांडली. मुख्यमंत्री निश्चितीसाठी थोडे थांबा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहण्यापेक्षा उद्धव ठाकरेंची पसंती पक्षप्रमुखपदालाच आहे. ते मुख्यमंत्री झाल्यास शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी कुणाकडे सोपवायची, हा प्रश्न आहे. राज्यभरात पक्ष वाढवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी सक्षमपणे केले आहे. शिवसैनिकांचं त्यांच्याशी असलेले नाते पाहता, हे काम तेच अधिक प्रभावीपणे करू शकतात.
महत्त्वाच्या राजकीय बातम्या
महाविकासआघाडीचं सरकार आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही - नितीन गडकरी
शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा
'महाविकास आघाडी'मुळे पंकजा मुंडेंचा विधान परिषदेचा मार्गही खडतर
''शरद पवार कधी काय करतील हे अजितदादांना समजलं नाही, तर आम्हाला काय समजणार''