मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर ६ मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा पार पडला. मात्र खातेवाटपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कुरघोडी सुरु असल्याचं दिसून येत होतं. पण काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद देण्याचं निश्चित झालं. त्यानुसार काँग्रेसकडून नाना पटोले यांच्या नावाची घोषणा विधानसभा अध्यक्षपदासाठी करण्यात आली.
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळाल्यानंतर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी कोणाची निवड होणार हा निर्णय अद्याप झाला नाही. अजित पवार, जयंत पाटील यांच्यातील उपमुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच आहे. शरद पवारच याबाबतीत अंतिम निर्णय घेणार आहे. पण सध्यातरी उपमुख्यमंत्रिपदापेक्षा विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीला प्राधान्य महाविकास आघाडीकडून देण्यात येत आहे.
याबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून कोणत्याही नावाचा निर्णय घेण्यात आला नाही, कदाचित हिवाळी अधिवेशनानंतर या नावावर चर्चा होईल. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासाठी २२ डिसेंबरपर्यत वाट पाहावी लागणार असल्याचं कळतंय.
अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते असताना त्यांच्या नावाची चर्चा उपमुख्यमंत्रिपदासाठी होती मात्र भाजपाशी हातमिळविणी केल्यानंतर अजित पवारांबद्दल काही नेत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय. त्यामुळेच अजित पवारांबद्दल ठोस निर्णय घ्यायचा अधिकार शरद पवारांना आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार समर्थकांनी आग्रही मागणी केली आहे. मात्र अजितदादांचे बंड पाहता राष्ट्रवादीकडून यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळकाढूपणा करण्यात येत आहे.
दरम्यान, आज उद्धव ठाकरेसरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पक्षनेते जयंत पाटील यांनी घेतली. त्यात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. कामकाजात सहभाग घेऊन मतदान प्रक्रियेत पक्षाचा निर्णय पाळावा असा आदेश पक्षाकडून आमदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुमत चाचणीवेळी नेमके किती आमदार सरकारच्या पाठिशी उभे राहतात हे स्पष्ट होणार आहे. मात्र त्यासाठी महाविकास आघाडीकडूनही विशेष खबरदारी घेताना पाहायला मिळतंय. जवळपास १६५ च्या वर आमदार सरकारच्या बाजूने असतील असं सांगण्यात येत आहे.