Maharashtra Government: स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण कोण करणार? शिंदे सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 08:46 PM2022-08-11T20:46:09+5:302022-08-11T20:47:17+5:30
Maharashtra Government: स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयांमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हा मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण कोण करणार याची यादी प्रसिद्ध केली आहे.
मुंबई - राज्यात नवे सरकार आल्यानंतर लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतर अद्याप खातेवाटप न झाल्याने स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण कोण करणार हा प्रश्न विचारला जात होता. त्यातच स्वातंत्र्यदिन सोहळा हा अवघ्या चार दिवसांवर आल्याने याबाबत निर्णय घेणे अत्यावश्यक बनले होते. दरम्यान, स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयांमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हा मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण कोण करणार याची यादी प्रसिद्ध केली आहे.
शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारमधील मंत्री आणि अधिकारी विविध जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करतील. यामध्ये नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार, पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील, अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, नाशिकमध्ये गिरीश महाजन, धुळ्यामध्ये दादाजी भुसे, जळगावमध्ये गुलाबराव पाटील, ठाण्यामध्ये रवींद्र चव्हाण, मुंबई उपनगरमध्ये मंगलप्रभात लोढा, सिंधुदुर्गमध्ये दीपक केसरकर, रत्नागिरीमध्ये उदय सामंत, परभणीमध्ये अतुल सावे, औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे, सांगलीमध्ये सुरेश खाडे, नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित, उस्मानाबादमध्ये तानाजी सावंत, साताऱ्यामध्ये शंभुराज देसाई, जालनामध्ये अब्दुल सत्तार, यवतमाळमध्ये संजय राठोड हे मंत्री ध्वजारोहण करतील.
तर अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त अमरावती, कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड येथे तेथील जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.