Maharashtra Government: मग शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सतर्क का केले नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 08:26 AM2019-12-02T08:26:49+5:302019-12-02T08:31:07+5:30

पण उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असणारा शिवसैनिक ते स्वत:च होते, हे आता दिसून आले आहे.

Maharashtra Government: Why did Shiv Sena leaders not alert Uddhav Thackeray? Says by RSS Paper Tarun Bharat | Maharashtra Government: मग शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सतर्क का केले नाही?

Maharashtra Government: मग शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सतर्क का केले नाही?

googlenewsNext

मुंबई - उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव नाही. पक्ष चालवणे वेगळे आणि सरकार चालवणे वेगळे. याचा अनुभव आता उद्धव ठाकरे यांना येत असावा. पक्ष चालवताना फारसे नियम आणि कायदे पाळण्याची गरज नसते. मात्र, विधिमंडळाचे कामकाज तसेच सरकार चालवताना घटना तसेच नियम आणि कायदे धाब्यावर बसवता येत नाहीत. मुख्यमंत्रिपदाची मागणी करणे वेगळे, प्रत्यक्षात मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर ते सांभाळणे किती कठीण असते, याचा अनुभव आता उद्धव ठाकरे घेत असतील असं संघाचं मुखपत्र असलेलं तरुण भारतने शिवसेनेवर टीका केली आहे. 

तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार नव्हते. नाईलाजाने त्यांच्या गळ्‌यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांना आपल्या मुलाला आदित्यला मुख्यमंत्री करायचे होते. पण अनननुभवी आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेसोबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही मान्य नव्हते. उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची निवड केली होती. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते यांच्यासारखे अनेक नेते शिवसेनेत होते. पण उद्धव ठाकरे यांना आदित्यशिवाय मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेत दुसरा कोणी लायक उमेदवार सापडला नाही अशा शब्दात संघाकडून शिवसेनेची कानउघडणी करण्यात आली आहे. 

तरुण भारत अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. अपेक्षेप्रमाणे बहुमत सिद्ध केल्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचे घोडे गंगेत न्हाले. पण त्यांच्या सरकारचा पुढील प्रवास सोपा नाही, याचा अनुभव ताज्या घटनाक्रमाने आला आहे. 
  • विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे पंचतारांकित हॉटेलातील कैदेतून आता शिवसेनेच्या आमदारांची सुटका होऊ शकते. मात्र, ज्या घाईगर्दीने उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले, त्यामुळे आपल्या सरकारच्या पाठीमागे बहुमत आहे की नाही, याबाबत त्यांनाच पुरेशी खात्री नसावी, असे दिसते. 
  • माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा आणि अन्य आक्षेप घेतला आहे. राज्यपालांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे 3 डिसेंबरपर्यंत नव्या सरकारने बहुमत सिद्ध केले असते तरी फारसे बिघडले नसते. पण शनिवारीच विधानसभेचे तातडीचे अधिवेशन बोलावून उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करून दाखवले. ही यांची घाई संशयाला जागा निर्माण करणारी आहे.
  • कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले असते, तर फारसे बिघडले नसते. मात्र, दिलीप वळसे पाटील यांची काळजीवाहू अध्यक्ष म्हणून निवड करत नव्या सरकारने एकप्रकारे जुन्या काळजीवाहू अध्यक्षांवर अविश्वास दाखवला, असे म्हणावे लागेल. 
  • देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले सर्व आक्षेप दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले असले, तरी त्यात तथ्य नव्हतेच, असे म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी ज्या पद्धतीने शपथ घेतली, त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. 
  • शपथ ही विहित नमुन्यातच घ्यावी लागते. त्यात फेरफार करता येत नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेणार्‍या मंत्र्यांनी आपल्या निष्ठांचे जे ओंगळवाणे प्रदर्शन केले, ते लोकशाहीला न शोभणारे तसेच चीड आणणारे होते. या मुद्यावर राज्यपालांकडे धाव घेण्यासोबत न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 
  • उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेत आले, त्यामुळे विधिमंडळाचे नियम तसेच प्रथा आणि परंपरा यांची त्यांना माहिती नसावी, हे एकवेळ समजू शकते. पण उद्धव ठाकरे सोडून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम आणि दिवाकर रावते आदी नेते तर कित्येक वर्षांपासून विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांना तर सर्व नियमांची चांगली माहिती आहे, मग त्यांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत सतर्क का केले नाही, असा प्रश्न पडतो.
  • एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवण्याचा शब्द मी बाळासाहेब ठाकरे यांना दिला, असे उद्धव ठाकरे आधी वारंवार म्हणत होते. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम आणि दिवाकर रावते यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री केले असते, तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवल्याबद्दल स्वर्गात बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यालाही समाधान लाभले असते. पण उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असणारा शिवसैनिक ते स्वत:च होते, हे आता दिसून आले आहे.
  • आपल्या किचन कॅबिनेटच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवले तर ते स्वत: अडचणीत येतील, पण राज्याला तसेच राज्यातील जनतेलाही अडचणीत आणतील. कारण, त्यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा आक्रमक तसेच अभ्यासू विरोधी पक्षनेता आहे, याची जाणीव उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, त्यातच त्यांचे भले आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करताना याचा अनुभव त्यांनी घेतला आहे. 
     

Web Title: Maharashtra Government: Why did Shiv Sena leaders not alert Uddhav Thackeray? Says by RSS Paper Tarun Bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.