Maharashtra Government: 'परत येईन म्हटलं पण कुठं बसेन ते सांगितलं नाही'; जयंत पाटलांची फडणवीसांना कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 01:44 PM2019-12-01T13:44:37+5:302019-12-01T13:45:07+5:30
तसेच मी परत येईन म्हटलं पण कुठं बसेन ते सांगितलं नाही, फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड योग्य आहे
मुंबई - विधिमंडळाचं विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची निवड झाली तर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी फडणवीसांचे अभिनंदन करताना जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. गेली ५ वर्ष फडणवीसांनी चांगले काम केले. एखादा विषय समजावून घेऊन प्रश्न सोडविले. प्रसिद्धीप्रमुख म्हणूनही देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी काम केलं होतं. त्याचा फायदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून सरकार चालविताना झाला. आमच्या काळात आम्ही प्रसिद्धीसाठी निधी ठेवला पण आमच्या बाबांनी सांगितले इतका पैसा प्रसिद्धीवर खर्च करायचा नाही असं सांगत फडणवीसांना चिमटा काढला.
तसेच मी परत येईन म्हटलं पण कुठं बसेन ते सांगितलं नाही, फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड योग्य आहे. नितीन गडकरी यांनी २०१४ पूर्वी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. भाजपा आमदारांमधून तुमची निवड करण्यात आली. यावेळीही या पदासाठी सर्व भाजपा आमदारांपैकी विखे पाटील सोडून तुमची निवड करण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटील आमचेच आहेत, त्यांना आम्ही ओढून आणू असं सांगत जयंत पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावला.
तसेच पुढील ५ वर्ष तुम्ही त्याठिकाणीच बसावं, या बाकांवर येण्याचा प्रयत्न करु नये, २०२४ मध्ये लोकशाही मार्गाने प्रयत्न करायला हवेत, तुमचे संबंध सगळ्यांशी जवळचे आहे. प्रत्येकाला दिलेल्या खुर्च्या फिक्स आहेत. खुर्च्या बदलण्याचे प्रयत्न कोणी केले तर आपल्याकडून त्याला प्रतिसाद मिळणार नाही असं काम करा. विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीचा मान वाढविण्याचा प्रयत्न तुमच्याकडून व्हावा. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचा काम कराल अशी शुभेच्छा देतो असं सांगत अप्रत्यक्षरित्या घोडेबाजारावरुन राष्ट्रवादीचे नेते जंयत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.