मुंबई: गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळाला. महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, त्यामुळे आपले सरकार तरेल आणि आपल्याला मंत्रिमंडळात संधी मिळेल, या आशेवर असलेल्या जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांचे अवसान आता पार गळाले आहे. महाविकासआघाडी सत्तारुढ होण्याची वेळ जवळ येताच ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आता सत्तेत आपलं गणित कुठे आणि कसं जुळेल, याची गणितं बांधण्यास सुरुवात केली आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पक्षामध्ये जवळीक निर्माण झाली होती. निवडणुकीत अनेक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने एकमेकांना सहकार्य देखील केलं होतं. त्यामुळे मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यमंत्री पद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाण्याचे विद्यमान महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांचीही नावे विधानपरिषदेसाठी पुढे आले आहे. विशेष म्हणजे मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील यांच्या वाट्यालाही राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यमंत्री पद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच राज्याच्या सत्तासमीकरणात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या ठाणे जिल्ह्याला मंत्रिमंडळातही मानाचे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे मागील कित्येक वर्षांपासून महत्वाच्या पदांसाठी डावलले गेलेले शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना येत्या काही महिन्यांत नव्या समीकरणामुळे बढती मिळण्याची चिन्हे आहे. पक्षाकडून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. तसेच शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महत्वाची खाती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक यांचीही नावे आता आघाडीवर आली आहेत. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच होण्याची शक्यताही आहे.
अवघ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांमध्ये अनुभवलेल्या राजकीय घडामोडींमध्ये ठाण्याचे विशेष महत्त्व होते. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या ठाण्यातील नेत्यांनी या राजकीय घडामोडींमध्ये मोठी खिंड लढवली. फुटलेल्या आमदारांना परत आणणे, त्यांना सुरक्षित ठेवणे, त्यांची बडदास्त राखण्याचे महत्त्वाचे काम शिंदे आणि आव्हाड यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्याकडे युती सरकारमध्येही महत्त्वाचे खाते आहे. आता शिवसेनेच्या सरकारमध्ये त्यांना यापेक्षाही चांगली जबाबदारी मिळू शकते. एकनाथ शिंदे हे पुन्हा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि कॅबीनेटमध्येही महत्वाचे पद त्यांना पुन्हा मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांना गृहखाते, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य किंवा अन्य महत्त्वाचे खाते मिळण्याची चिन्हे आहेत. त्याचप्रमाणे आव्हाडांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता असून, त्याचबरोबर कॅबीनेटमध्ये शालेय खाते किंवा वैद्यकीय खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. रविंद्र फाटक यांनाही राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता असून, सरनाईकांच्या वाट्याला काय येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.