बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा: भगतसिंह कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 09:43 AM2019-12-20T09:43:30+5:302019-12-20T09:46:37+5:30
पूर्वी अनेक घरांमध्ये मुलींची पूजा केली जायची. मात्र हल्ली महिलांवरील अत्याचार-बलात्काराच्या घटना वाढत आहेत.
नागपूरः हैदराबादमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देश हादरला आहे. 'निर्भया'नंतर 'दिशा'वर झालेले अत्याचार मन सुन्न करणारे आहेत. या भयानक घटना रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची, महिला संरक्षणासाठी कठोर कायदे करण्याची मागणी सर्वच स्तरांतून होतेय. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक वेगळाच तोडगा सुचवला आहे. बलात्काराच्या घटना रोखण्याच्या दृष्टीने आपल्या विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा, अशी सूचना कोश्यारी यांनी नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना केली. त्यांनी दिलेल्या या सल्ल्यावर सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, पूर्वी अनेक घरांमध्ये मुलींची पूजा केली जायची. मात्र हल्ली महिलांवरील अत्याचार-बलात्काराच्या घटना वाढत आहेत. महिलांना धमक्या देऊन त्यांच्यावर अत्याचार केले जातात. त्यामुळे या सर्वांपासून स्वत:चे संरक्षण करायचे असल्यास विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक शिकायला हवेत, त्या माध्यमातून अत्याचाराच्या घटना टाळता येतील, असं मत भगत सिंह कोश्यारी यांनी मांडलं. नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाचं उद्घाटन कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी झालं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या व वाईट लोकांमधील फरक समजावून सांगितला.
हैदराबादमधील बलात्काराच्या घटनेनंतर आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू केला आहे. बलात्कार प्रकरणांची सुनावणी १४ दिवसांत करून बलात्काऱ्यांना २१ दिवसांत फाशी देण्याची तरतूद या कायद्यात आहे. अशाच प्रकारचा कठोर कायदा महाराष्ट्र सरकारनेही करावा, अशी मागणी करण्यात येतेय.