Join us

Bhagat Singh Koshyari: नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत बनला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 8:08 PM

Bhagat Singh Koshyari: "पंडित जवाहरलाल नेहरू स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला"

Bhagat Singh Koshyari: पंडित जवाहरलाल नेहरू स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला, असं विधान राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित 'अशक्य ते शक्य' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इतर नेते उपस्थित होते. (maharashtra governor bhagat singh koshyari sparks controversy with his remarks on jawaharlal nehru)

"अटलबिहारी वाजपेयींचा अपवाद वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं. पंडीत जवाहरललाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होतं", असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. 

वाजपेयींच्या काळात देशात अणुचाचणी झाली. खंतर हे तंत्रज्ञान २० वर्षांपासून आपल्याकडे तयारच होतं. पण त्याआधी सरकारनं अणुचाचणी करण्याची हिंमत दाखवली नाही. अणुचाचणीमुळे भारतावर जागतिक निर्बंध आले, पण वाजपेयी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि देशाची कणखर प्रतिमा जगाला दाखवून दिली, असंही कोश्यारी पुढे म्हणाले. 

कारगिल विजय दिनानिमित्त सीमेवर लढलेल्या जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा राज्यपालांच्या हस्ते यावेळी सत्कार देखील करण्यात आला. 

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीभाजपाजवाहरलाल नेहरूकारगिल विजय दिन