मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सध्यातरी कुठलाही विचार राज्य सरकारचा नसल्याचे दिसून येत आहे. कारण, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षण वर्गासाठी शिक्षण विभागाकडून काही मागर्दर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेशच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षणावर सरकारने भर दिला आहे. मात्र, शासनाने रिलायन्स जिओसोबत घाईघाईने करार केल्याचा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून २० जुलैपासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जात आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या मालिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. तर, इयत्ता 1 ली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असून त्यासाठी वेळेची मर्यादा आणि शिक्षणाचे स्वरुप जाहीर करण्यात आले आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षणपद्धतीसाठी सरकारने रिलायन्स जिओसोबत काही करार केले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या शिक्षण विभागाने सह्याद्री वाहिनीला शिक्षणाचा प्रस्तावच अद्यापपर्यंत पाठविला नाही. तर, दुसरीकडे रिलायन्स जिओसोबत घाईघाईने करार केला आहे. दूरदर्शनसोबत दिरंगाई आणि रिलायन्ससोबत घाई यामागे नेमकी काय गोम आहे, असा प्रश्न भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. दीड महिन्यांपूर्वीच रिलायन्स जिओसोबत सरकारने ऑनलाईन शिक्षणासाठी करार केला आहे. मात्र, ही तत्परता सरकारने सह्याद्री या सरकारी वाहिनीसाठी का दाखवली नाही, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे. तसेच, याप्रकरणाच्या चौकशीची मागणीही अतुल भातखळकर यांनी केली आहे.