- संजीव साबडे।
मुंबई : तिहेरी तलाक घटनाबाह्य आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला असला तरी त्यासाठीची लढाई राज्यात १९६६ पासूनच सुरू झाली आणि तिचे नेतृत्व केले होते हमीद दलवाई यांनी. त्यांनीच मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापनाही केली. तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व यांच्या विरोधात हमीदभाई लढत राहिले. त्यांनीच या मागण्यांसाठी१८ एप्रिल १९६६ रोजी पहिला मोर्चा काढला होता.समान नागरी कायदा करा, ही मागणीही मुस्लिमांमधून प्रथम केली ती हमीद दलवाई यांनीच. तिहेरी तलाक बंद करा, हलाला, बहुपत्नीत्वाची पद्धत बंद करा, देशात समान नागरी कायदा लागू करा, उलेमांचा धिक्कार असो, असे फलक घेऊ न अनेक महिला त्या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्या वेळी मोजके मुस्लीम त्यांच्यासोबत होते. पण समाजवादी, कम्युनिस्ट असे अनेक डावे कार्यकर्ते तसेच शरद पवार हेही त्यांच्यामागे उभे राहिले. अ. भि. शहा, मे. पुं. रेगे, डॉ. राम बापट, डॉ. भालचंद्र मुणगेकर असे विचारवंत हमीद दलवार्इंच्या लढ्यात तेव्हा सहभागी होते.हमीद दलवाई यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मेहरुन्नीसा दलवाई, अब्दुल कादर मुकादम, सय्यदभाई, राजन अन्वर, रझिया पटेल अशा अनेक कार्यकर्त्यांनी जागृतीचे कार्य सुरू ठेवले. शाह बानो खटल्याच्या वेळी निकालाविरुद्ध कायदा करू नका, अशी मागणी करण्यासाठी ही सारी मंडळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना भेटली होती. एकीकडे मुस्लीम समाजाचा विरोध आणि दुसरीकडेराजकीय पक्षांचे अनुनयाचे राजकारण सुरू असतानाही ही चळवळ आजपर्यंत सुरूच आहे.