राज्यावर पावणेसात लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर; आर्थिक स्थिती नाजूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 04:16 AM2019-12-11T04:16:13+5:302019-12-11T06:05:47+5:30
४४,९३४ कोटींच्या कर्जालाही हमी, जीडीपी घसरुन आला ७.२ टक्क्यांवर
- अतुल कुलकर्णी
मुंबई : महाराष्ट्रावर चालू आर्थिक वर्षात तब्बल ६,७१,६४२ कोटींचे कर्ज झाले आहे. शिवाय ४४,९३४ कोटी रुपयांच्या कर्जासाठी सरकारने हमी दिलेली आहे. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढलेले आहे. ही माहिती राज्याच्या वित्त विभागाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या सादरीकरणातून समोर आली आहे.
राज्याचा जीडीपी (स्थूल राज्य उत्पादनाचा वृध्दीदर) २०१६-१७ मध्ये ९.२ टक्के होता जो २०१८-१९ मध्ये ७.२ टक्के झाला आहे. एकूण खर्चाच्या प्रमाणात २०१०-११ ला भांडवली खर्चाचे प्रमाण १५ टक्के होते जे २०१९-२० मध्ये ११ टक्के झाले आहे. हे प्रमाण जर कायम राहीले असते तर भांडवली खर्चासाठी ५९,५४५ कोटी रुपये मिळू शकले असते, असे वित्त विभागाचे म्हणणे आहे.
आघाडी सरकारच्या काळात म्हणजे २०११-१२ या वित्तीय वर्षात राज्यावरील एकूण कर्ज २,२५,९७६ कोटी होते. आघाडीचे सरकार २०१४-१५ मध्ये पायउतार झाले व भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी राज्यावरचे कर्ज होते २,९४,२६१ कोटी. याचा अर्थ आघाडी सरकारच्या काळात हे कर्ज ६८,२८५ कोटींनी वाढले. तर भाजपचे सरकारच्या काळात १,७७,३८१ कोटींनी वाढले. त्याशिवाय अर्थसंकल्प बाह्य कर्ज २ लाख कोटी झाले. शिवाय २०१८-१९ अखेर शासनाने २५,१३४.८६ कोटी तर २०१९-२० मध्ये १९,८०० कोटी एवढ्या कर्जास हमी दिलेली आहे.
समृध्दी महामार्गासाठीच्या १७,००० कोटींच्या कर्जासाठी सरकारने हमी दिलेली आहे. त्याशिवाय मुंबई पारबंदर प्रकल्प १५,१०० कोटी, मुंबई मेट्रो ३६०० कोटी, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला २८०० कोटी, राज्य सहकारी बँकेने दिलेल्या कर्जापैकी २,३२२.१७ कोटी एवढ्या रकमेची हमी आवाहनित केली आहे.
राज्याची आर्थिक परिस्थीती काय आहे हे आम्हालाही आत्ता सरकारमध्ये आल्यावर कळत आहे. आम्ही सत्तेवर असताना राज्यावर किती कर्ज होते आणि भाजप सरकारने पाच वर्षात ते कर्ज साडे सहा लाख कोटींवर नेऊन ठेवले आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्टÑ या लोकांनी हे आता जनतेला समजत आहे. परिस्थिती गंभीर करुन ठेवली आहे. पण आमचे महाविकास आघाडीचे सरकार यातून मार्ग काढेल.
- बाळासाहेब थोरात, मंत्री
शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाहीत म्हणून राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही असे दाखवण्याचे प्रकार हे सरकार करत आहे. आम्ही विकास कामांसाठी कर्ज काढले. मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंकसाठी कर्ज घेतले.कर्जासाठीची हमी ही राज्याच्या सकल उत्पन्नाच्या बाहेरची असते. जे २ लाख कोटींचे अर्थसंकल्पबाह्य कर्ज असल्याचे हे सांगत आहेत, ते कर्ज विविध महामंडळांचे आहे.
- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता