मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आदित्य ठाकरे यांनी कमालीचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, एअरबस प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातमध्ये गेल्याने आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे सरकारवर घणाघात सुरू आहे. एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे आणि राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आपला महाराष्ट्र मागे पडला, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे आणि राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आपला महाराष्ट्र हा गेले दोन चार महिने फटका खात पुढे चालला आहे. पुढे चाललाय की मागे चालला आहे ते आपण ठरवायंच आहे. पण कायदा सुव्यवस्था असेल, उद्योजक आणि त्यांचं गत असेल किंवा शेती असेल, कुठेही लक्ष न देता राजकारण एके राजकारण, घाणेरडं राजकारण याच्यावर सरकारचं लक्ष केंद्रित राहिलं आहे. म्हणून आज निषेध करावा तितका थोडाच आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्या वैफल्यातूनच त्यांनी शिंदेवर टीका केली आहे, असा पलटवार भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. प्रवीण दरेकर म्हणाले की, तुम्ही पाहिलं असेल तर एअरबसचा प्रकल्प हा एक वर्षापूर्वी बाहेर गेला. एक वर्षापूर्वी राज्यात सरकार कुठे होतं. तर ते मातोश्रीत होतं. सरकारला मंत्रालयात यायला, बघायला वेळ कुठे होता? या काळात उद्योगमंत्री काय करत होते? ते कशात मश्गूल होते. त्यामुळे त्यांच्या काळात घडलेल्या गोष्टीची यांना एक वर्षाने जाग आली आहे. या एक वर्षात या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला का, तर काहीच केलं नाही, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.