नवनीत राणांवर 'डी गँग'शी आर्थिक संबंधाचा आरोप; गृहविभाग म्हणालं आमच्याकडे कोणतीही तक्रार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:39 PM2022-04-27T14:39:58+5:302022-04-27T14:39:58+5:30
नवनीत राणा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित आणि ईडीनं अटक केलेल्या युसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपये घेतले होते.
मुंबई-
मुंबईत 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेला गोंधळ आणि कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. नवनीत राणा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित आणि ईडीनं अटक केलेल्या युसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपये घेतले होते. याप्रकरणात नवनीत राणा यांची कोणतीही चौकशी झालेली नाही, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला. राऊतांनी यासंदर्भातील एक कागद देखील ट्विटरच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या याच आरोपांवर आता राज्याचं गृहविभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई केली जाणार का? असं राज्याच्या गृहविभागाला विचारण्यात आलं असता आमच्याकडे यासंदर्भात अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. पण तक्रार आल्यास संबंधित प्रकरणाबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत याप्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
On Rs 80 lakh allegations levelled by Shiv Sena's Sanjay Raut against MP Navneet Kaur accusing her of taking a loan from Yusuf Lakadwala of the said amount, Maharashtra Home Dept says it has not received any complaint in the matter, will take action if a complaint is received
— ANI (@ANI) April 27, 2022
नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे त्यांनी दिलेल्या अॅफिडेविटवर नमूद आहे. युसुफ लकडावाला याचा काही दिवसांपूर्वीच तुरुंगात मृत्यू झाला. याच लकडावालाला ईडीने पैशांची अफरातफर आणि दाऊद गँगशी संबंध असल्याप्रकरणी अटक केली होती, असे ट्विट राऊतांनी केले आहे.
कोण होता युसूफ लकडावाला?
मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि फायनान्सर युसूफ लकडावालाचा (७६) ऑर्थर रोड कारागृहात सप्टेंबर २०२१ मध्ये मृत्यू झाला होता. मनी लाँड्रिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. २०१९ मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली लकडावालाला अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर हैदराबादचे नबाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथील जमिनीशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्याला अटक केली. वारंवार समन्स बजावूनदेखील हजर न झाल्यामुळे ईडीने अटकेची कारवाई केली होती.